अकोला, दि. ६- महापालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच युती किंवा आघाडी न करता शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारिप-बमसं स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. यात भरीस भर अकोला मनपाच्या आखाड्यात एमआयएमने उडी घेतली. सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने यावेळी मुस्लीम मतदारांचा कौल नेमका कोणाकडे जाईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या परंपरागत असलेल्या मुस्लीम व्होट बँकेला सुरुंग लावण्याचे काम सुरू झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक महत्त्वांच्या पदांवर मुस्लीम नेत्यांनी स्थान दिले आहे. मुस्लीम मतांचा गठ्ठा शिवसेना किंवा भाजपच्या पारड्यात पडत नसल्याची कार्यकर्त्यांंची भावना आहे. आजपर्यंंत युती किंवा आघाडीच्या माध्यमातून एकमेकांची व्होट बँक चुचकारणार्या भाजप-शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला त्याची ताकद, जनमानसातील पक्षाचे अस्तित्व दिसून येणार आहे. उमेदवारांचे तिकीट वाटप झाल्यानंतर राजकीय सारीपाटावरील हालचालींनी वेग घेतला आहे. अशा स्थितीत अकोला महापालिकेच्या महासंग्रामात एमआयएमने उडी घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिपच्या समीकरणांवर पाणी फेरल्याची चर्चा शहरात सुरू आहे. एमआयएममुळे मुस्लीम मतांमध्ये विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. आजपर्यंंत प्रस्थापित राजकीय पक्षांनी विकासाला तिलांजली दिल्याचा मुद्दा घेऊन एमआयएम निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे अनेक ांची कोंडी झाल्याचे बोलल्या जात आहे. या सर्व बाबी पाहता सुज्ञ मुस्लीम मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस, राष्ट्रवादी व भारिप-बमसंच्या पारड्यात मुस्लीम मतदारांनी नेहमीच मतांचे भरभरून दान दिले आहे. त्या-त्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली होती. तर सोशल इंजिनिअरिंग प्रयोगाच्या माध्यमातून मुस्लीम बांधवांनी भारिपला अनेकदा पसंती दिल्याचे दिसून येते. यंदा सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने मुस्लीम मतांचे विभाजन नेमके कोणाच्या पथ्यावर पडेल, यावर शहरात मोठय़ा चवीने चर्चा होत आहेत.
मुस्लीम मतदारांचा कौल कोणाकडे?
By admin | Published: February 07, 2017 3:23 AM