गतवर्षी डिसेंबर महिन्यात उतरणीला लागलेला कोरोनाचा आलेख यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वरच्या दिशेने आगेकूच करत आहे. शासन मान्य करीत नसले, तरी समूह संसर्ग सदृशस्थिती निर्माण झाली असून, बाधित होणाऱ्यांची दैनंदिन आकडेवारी जुने विक्रम मोडत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हायरिस्क संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. नागरिकांमध्येही जागृती आल्याने स्वत:हून चाचणी करून घेणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयएमए हॉल, मनपाचे भरतीया रुग्णालयास विविध तपासणी केंद्रांवर चाचणीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. या सर्वच केंद्रांमध्ये रांगा लागत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग चाचणी केल्यानंतर अहवाल मिळविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कक्षासमोरही संदिग्ध रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांची दररोजच मोठी रांग लागलेली असते. रांगेत दोन दोन तास उभे राहूनही अनेकांना वेळेवर अहवाल प्राप्त होत नाहीत. या रांगांमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोना प्रतिबंधक नियम पाळल्या जात नसल्याने या रांगा कोरोनाचा संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तपासणी केंद्रावर कोरोना चाचणी करण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी गर्दी पाहून चाचणी न करताच परत जाण्याचा विचार करत आहे. उद्या किंवा परवा सकाळी लवकर येऊन चाचणी करून घेईल.
-आत्माराम बोडखे, अकोला
सामान्य सर्दी, ताप झाल्यामुळे चार दिवस रजेवर होतो, आता कार्यालयात रुजू होण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य असल्याने चाचणी करण्यासाठी आलो आहे. तपासणी केंद्रावर मोठी गर्दी असून, अनेकांनी मास्कही घातलेले नाहीत. त्यामुळे या गर्दीत उभे राहिल्यास संसर्ग होण्याची भीती वाटत आहे.
-सदाशिव राऊत, अकोला
पाच दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग चाचणी करून घेतली. अजूनपर्यंत मोबाइलवर कोणताही मेसेज आला नाही. त्यामुळे अहवाल घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कक्षासमोर रांगेत उभे राहावे लागत आहे.
-सुनील बोरेकर