फाेन टॅपिंगचे रेकार्ड दिले तरी कुणाला; खऱ्या सूत्रधाराचा शाेध लावा : काॅंग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 03:59 PM2022-03-01T15:59:04+5:302022-03-01T15:59:10+5:30
Congress News : खऱ्या सूत्रधारावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे.
अकाेला : दहशतवादी कारवाया, अंमली पदार्थांचा व्यापार अशा गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले जाते. परंतु महाविकास आघाडीतील नेत्यांचा याच्याशी काहीही संबंध नसताना तो दाखवून फोन टॅप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी फोन टॅपिंगचे रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिले ? फोन टॅपिंगचा मूळ उद्देश काय होता? रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे आदेश कोणी दिले? असे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे.
स्थानिक विश्रामगृहामध्ये साेमवारी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव मदन भरगड, मनपाचे माजी विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश भारती, प्रसिद्धीप्रमुख तथा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण ताले पाटील उपस्थित होते. डाॅ. ढाेणे म्हणाले की, फोन टॅपिंगप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे, अशी सुप्रिम कोर्टाची सूचना आहे. सरकारमधील कोणा वरिष्ठाचा आशीर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे, असा आराेप करत अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात हस्तक असणाऱ्या शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, खऱ्या सूत्रधारावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार असताना २०१७-१८ साली नाना पटोले यांच्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीत रश्मी शुक्ला दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल झाला असला तरी चौकशीची व्याप्ती वाढवून जलदगतीने तपास करावा आणि या प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड कोण आहे, हे शोधून त्याच्यावरही कडक कारवाई करावी, अशी मागणी डाॅ. ढोणे यांनी केली आहे.