अकोला : उपाशी पोटी आतड्यांना पिळ पडल्यानंतर जेव्हा डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात, तेव्हा कळतं भूक काय असते? तसे तर बालपण खेळण्या-बागडण्याचे वय. या वयात मनसोक्त खेळणे, संकट, समस्यांपासून मुक्त राहून भविष्याची पायाभरणी करणे, हेच अपेक्षित असते. मात्र, शहरातील अनिकट, वाशिम बायपास परिसरातील मुलांच्या नशिबी भलतेच दारिद्रय़ आले आहे. या गरिबीने त्यांच्यापासून त्यांचे सुखच हिरावले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी या मुलांना तासन्तास मेहनत घेऊन वेळप्रसंगी जीव धोक्यात घालावा लागत आहे. एवढे सर्व करूनही त्यांना दिवसाला मिळते काय ते पाच ते दहा रुपये. नुकताच हर्षोल्हासात गणेश उत्सव साजरा झाला. अकोल्यातही लाखो लोकांनी हा उत्सव आनंदाने साजरा करीत नुकतेच गणेश मूतर्ी्ंचे शहरातून वाहणार्या मोर्णा नदीत विसर्जन केले. गणेश मूर्तीसोबतच दहा दिवसांचे हार फुलांचे निर्माल्यही विसजिर्त करण्यात आले. या निर्माल्यासोबतच गणेश मूर्तीसमोरील, कलशामध्ये ठेवलेले पैसेही नदीत फेकण्यात येतात आणि मग विसर्जनाच्या दुसर्या दिवसापासून सुरू होतो तो या पैशांचा शोध. शहरातील अनिकट, हरिहरपेठ व वाशिम बायपास या नदीकाठच्या भागात दहा ते पंधरा हजार लोकांची वस्ती आहे. कमालीचे दारिद्रय़ या लोकांच्या नशिबी आले आहे. शिक्षणाचे तर नामोनिशाणही नाही. मोलमजुरी करणे, कुटुंबाचे पालनपोषण करणे, हीच दिनचर्या. त्यातही व्यसनांचा भडीमार. या भागातील पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुले-मुली दरवर्षी गणेश विसर्जनानंतर तीन ते चार दिवस नदीमध्ये पैशांचा शोध घेत असतात. शाळा अन् शिक्षण तर माहितीच नाही. ही मुले टेपरेकॉर्डरचा स्पीकरला लोहचुंबक लावतात. या लोहचुंबकाला दोरी बांधायची व ज्या ठिकाणी मूर्ती शिरविण्यात आल्या तेथे उभे राहून लोहचुंबक पाण्यात फेकायचे, ते फिरवायचे व बाहेर काढायचे. त्याला काही पैसे चिटकले का हे पाहायचे. पुन्हा फेकायचे. अशाप्रकारे दिवसभर पाण्यात उभे राहून, थोड्या थोड्या वेळाने जागा बदलून ही मुले पाण्यात पैशांचा शोध घेत असतात. आणि त्यांना मिळतात केवळ पाच ते दहा रुपये. तेही सापडण्याची शक्यता धुसरच. मात्र, तरीही गरिबी, पोटात ओरडणारे कावळेच त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करतात आणि जीव धोक्यात घालून ते पैशांचा शोध घेत असतात.
टिचभर पोटासाठी.. आयुष्याची बाजी!
By admin | Published: September 16, 2014 6:19 PM