अकोला: जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप पूर्ण का झाले नाही, असा सवाल जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत संतप्त सदस्यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद सेस फंडातून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांपैकी अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाच्या रकमेचा लाभ मिळाला नाही. या संदर्भात संताप व्यक्त करीत शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेता गोपाल दातकर यांनी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण का झाली नाही, असा सवाल सभेत उपस्थित केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना पुढील काळात अनुदानाच्या रकमेचा लाभ देण्याची मागणी जिल्हा परिषद सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत केली. वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका सेवाज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यास पदावरून कमी करण्याचा तोंडी आदेश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याच्या मुद्द्यावर सदस्य ज्ञानेश्वर सुलताने यांनी आक्षेप घेत विचारणा केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात एकापेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी असल्यास, त्यापैकी सेवाज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यास पदावरून कमी करता येत नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सभेत दिली. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांसंदर्भात सदस्य गजानन पुंडकर यांनी सभेत विचारणा केली. त्यानुषंगाने या संदर्भात माहिती देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेत उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, गजानन पुंडकर, चंद्रशेखर चिंचोळकर यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
‘एमओं’ना पाठीशी का घालता; ‘डीएचओं’ना विचारणा!
दहिहांडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाच्या दिवशी या केंद्राचे दोन वैद्यकीय अधिकारी (एमओ) अनुपस्थित होते. संबंधित ‘एमओं’ना पाठीशी का घालता, अशी विचारणा सदस्य गोपाल दातकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना (डीएचओ) सभेत केली. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी सदस्य ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत केली.