लसीकरण केंद्राबाहेरच काढली झोप
लसीकरणासाठी पहिला क्रमांक लागावा म्हणून काही लोक रात्री १.३० वाजताच भरतीया रुग्णालयाबाहेर ठिय्या मांडून बसल्याचे चित्र गुरुवारी पहाटे दिसून आले. हाच प्रकार सर्वोपचार रुग्णालय आणि जुने शहरातील कस्तुरबा गांधी सामान्य रुग्णालयाबाहेर दिसला. रात्रीपासून रांगेत लागलेल्या लोकांनी लसीच्या प्रतीक्षेत केंद्राबाहेरच झोप काढल्याचे नागरिकांनी सांगितले.
लोक स्वत:च वाटताहेत टोकन
लसीकरण केंद्र सकाळी ८ वाजता सुरू होते. केंद्र सुरू झाल्यानंतर टोकनसाठी गोंधळ उडू नये म्हणून लोक स्वयंशिस्तीने स्वत:च कागदांच्या चिठ्ठ्यांवर क्रमवारीने आपला क्रमांक वाटून घेताना दिसून आले. केंद्र सुरू झाल्यानंतर टोकन याच क्रमवारीने वाटपास सुरुवात होते. त्यामुळे केंद्राबाहेरील गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून लोकांनी स्वत:च ही कल्पना राबविण्यास सुरुवात केल्याचे चित्र गुरुवारी लोकमतने केलेल्या पाहणीतून दिसून आले.
कोरोना संसर्गाची भीती
लस मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक लसीकरणाच्या रांगेत रात्र काढत आहेत. त्यामुळे होणारे जागरण आणि इतरांशी होणाऱ्या थेट संपर्कामुळे ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. लसीकरणाच्या रांगेत अनेक जण विनामास्क दिसून आले. हा प्रकार कोरोनाच्या फैलावासाठी घातक ठरू शकतो.
अशी होती परिस्थिती
भरतीया रुग्णालय
रात्री १.३० वाजता - तीन जणांची उपस्थिती
पहाटे ५ वाजतापर्यंत १५० लोक रांगेत
रांगेत सुरक्षित अंतर नव्हते.
अनेकांकडून मास्कचा वापर नाही.
जीएमसी
पहाटे ४ वाजता लोक रांगेत लागण्यास सुरुवात झाली.
मलकापूर, खदान, उमरी, जुने शहर, अकोट फैल या भागातील लोक लसीकरणासाठी होते रांगेत.
कोव्हॅक्सिन नसल्याने अनेक लोक घरी परतले.
६ वाजताच्या सुमारास सुमारे २०० लोक रांगेत.
कस्तुरबा गांधी रुग्णालय
केंद्रावर कोव्हॅक्सिन असल्याने दुसऱ्या डोससाठी पहाटे ३ वाजतापासूनच केंद्रावर झाली गर्दी.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही. गोंधळ टाळण्यासाठी येथेही लोकांनी स्वत: क्रमवारीने वाटल्या चिठ्ठ्या.
पहाटे ६ वाजतापर्यंत रांगेत २०० लोकांची उपस्थिती
नागरिक म्हणतात...
कोरोनाची भीती आहे, मात्र लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून रात्री १.३० वाजतापासून भरतीया रुग्णालयाबाहेर बसलो आहे. प्रशासनाने ज्येष्ठांना घरोघरी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
- संतोष शर्मा, नागरिक
लसीकरण केंद्र उघडल्यानंतर टोकन मिळेलच हे निश्चित नाही. त्यामुळे रात्री २ वाजतापासून भरतीया रुग्णालयाबाहेर लसीकरणाच्या प्रतीक्षेत बसलो आहे. व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
- जितेंद्र बियाणी, नागरिक
मागील अनेक दिवसांपासून लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा होती. वारंवार रांगेत लागूनही लस मिळत नाही. त्यामुळे आज मलकापूर येथून पहाटे ४ वाजताच जीएमसी येथील लसीकरण केंद्राच्या गेट बाहेर उभा आहे.
- प्रकाश देशमुख, नागरिक
कोव्हॅक्सिनचा दुसऱ्या डोससाठी कस्तुरबा गांधी रुग्णालयाबाहेर रात्री ३ वाजतापासूनच बसलो आहे. कोव्हॅक्सिनचा तुटवडा आहे. त्यामुळे उशिरा आल्यावर लस मिळेलच हे निश्चित नाही म्हणून पहाटेच केंद्राबाहेर रांगेत लागलो.
-सुरेश अग्रवाल, नागरिक