नितीन गव्हाळे, अकोला : वडिलांनी कर्ज काढून मुलीचे लग्न लावून दिले. मनाजोगे स्थळ मिळाल्याने, वडिलांनीही लग्नात कोणतीही कसर ठेवली नाही. पण, लग्नाच्या काही महिन्यांतच तू मला पसंत नाही असे बोलून पतीने विवाहितेला मारहाण करण्यास सुरुवात केली. सासू-सासरेसुद्धा पत्नीला घटस्फोट दे, हिच्यापेक्षा सुंदर मुलगी तुला करून देऊ असे म्हणत छळ करायचे.
यामुळे अवघ्या सात महिन्यांतच संसाराचा काडीमोड करीत, पत्नीने पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध तक्रार दिली. अकोट फैल पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला. अकोट फैलातील दीक्षा आशिष बाविस्कर (२२) यांच्या तक्रारीनुसार, जळगाव येथील जय गुरुदेवनगरात राहणारा आशिष बाविस्कर याच्यासोबत फिर्यादीचे फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर पती आशिषने विवाहितेचा मानसिक छळ करणे सुरू केले. तू मला पसंत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये आंदण कमी दिले, असे म्हणत नेहमी मारझोड करायचा.
सासू अंजना बाविस्कर व सासरे सुभाष बाविस्कर हे पतीला भडकवून देत व हिला फारकत दे, हिच्यापेक्षा सुंदर मुलगी तुला आम्ही करून आणतो असे म्हणत छळ करायचे. तसेच गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावत होते. संसार करायचा असल्याने विवाहितेने माहेरी याबाबत वाच्यता केली नाही. अखेर पती व सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आई-वडिलांना सांगितले. या प्रकरणात विवाहितेच्या तक्रारीनुसार अकोट फैल पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.