लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देणारा पती लियाकत शाह शहादत शाह याला पहिले जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे राहणारा आरोपी लियाकत शाह याने २६ जून २0१५ रोजी कौटुंबिक वादातून पत्नी रेश्मा परवीन हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात रेश्मा गंभीररीत्या भाजली. तिला सर्वोचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. ३ जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रेश्माचा भाऊ वसीम शाह युसूफ शाह(रा. बाभळी दर्यापूर) यांच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३0७ व नंतर ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपी लियाकत शाह याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पहिले जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात सरकार पक्षाने १३ साक्षीदार तपासले. आरोपी लियाकत शाह याच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने साक्ष व पुरावे ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एक हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी विधिज्ञ राजेश्वर देशपांडे यांनी बाजू मांडली. हातात काठी घेऊन बारा तास घरासमोर पहाराआरोपी लियाकत शाह याने रात्री १ वाजताच्या सुमारास रेश्माला पेटवून दिल्यानंतर ती आक्रोश करीत होती. तिच्या मदतीला कोणी येऊ नये, यासाठी आरोपी हातात काठी घेऊन बारा तास घरासमोर पहारा देत होता. रेश्माचा आक्रोश शेजारच्यांना गेल्यावर त्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली; परंतु त्याने घरात जाण्यापासून सर्वांना मज्जाव केला होता. सकाळी रेश्माची आई आल्यानंतर तिलाही आरोपीने घरात जावू दिले नाही. तीन वेळच्या जबाबात तफावत८५ टक्के जळालेल्या रेश्माला मूर्तिजापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे पीएसआय एस.के. राठोड यांनी तिचा जबाब नोंदविला. त्यात तिने पतीने जाळल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी नायब तहसीलदाराने तिचा जबाब नोंदविल्यावर त्यात तिने स्वत: जळाल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा रेश्माचा इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. त्यात तिने पतीलाच दोषी ठरविले.किरकोळ वादातून जाळले !घटनेच्या तीन महिन्यांच्या अगोदर लियाकत शाह याचे दर्यापूर येथील रेश्मा परवीन हिच्यासोबत लग्न झाले होते; परंतु लियाकत पत्नीला तू जेवण चांगले बनवित नाही. या कारणावरून तिच्यासोबत वाद घालायचा. तिला मारहाण करायचा. २६ जून रोजी याच कारणावरून दोघा पती, पत्नीमध्ये वाद झाला होता.
पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:41 AM