अकोला : तालुक्यातील कौलखेड जहाँगीर या गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील तायडे यांच्या शेळ्या शेतात नेहमीप्रमाणे शेळी मजूर चारण्याकरिता घेऊन गेले होते. दरम्यान, शेळ्यांवर रानडुकरांनी हल्ला केल्याने दोन शेळ्या जागीच ठार झाल्या.
कौलखेड जहाँगीर परिसरातील भागातील वन्यप्राणी दररोज गावाजवळील डबक्यात व हौदावर पाणी पिण्यासाठी येत असतात. शनिवारी रानडुकरांनी एकाएकी हल्ला केल्याने दोन शेळ्या जाग्यावरच ठार झाल्या, तर एक बोकड व बकरीचे पिलू जखमी झाले. या घटनेचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेहरे यांनी केला. वन्यप्राणी हे शेतात भटकत असताना त्यांच्याकरिता कोणत्याही प्रकारची पाणी व्यवस्था वनविभागाने केली नाही. त्यामुळे ते गावात पाणी पिण्यासाठी येत आहेत. वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशा अनेक घटना या भागात घडलेल्या आहेत. त्यामुळे या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली आहे.