- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; मात्र रानडुकरांच्या उच्छादात पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच ‘खल्लास’ होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, कपाशी इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन अवकाळी पावसाने पळविल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; परंतु हरभरा पेरणी झालेल्या शेतांमध्ये रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच रानडुकरांचे कळप हरभरा बियाणे उखरुन फस्त करीत आहेत. पेरलेला हरभरा उगवण्याआधीच रानडुकरांच्या उच्छादात खल्लास होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.
जीव धोक्यात टाकून शेतकºयांचे जागरण !हरभरा पेरणी झालेल्या शेतांमध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप उच्छाद मांडून पेरलेला हरभरा उखरुन फस्त करतात. त्यामुळे रानडुकरांच्या तडाख्यातून हरभरा वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकून जिल्ह्यात शेतकºयांना राजीच्या वेळी शेतांमध्ये जागरण करावे लागत आहे.
कुटार पेटवून, डबे वाजवून डुकरांना पळविण्याचे प्रयत्न !पेरलेला हरभरा रानडुकरांच्या तावडीतून वाचविण्यासाठी रात्रीच्या वेळी सामूहिकपणे शेतकºयांना शेतात जागरण करावे लागत आहे. शेताच्या धुºयावर कुटार आाणि काडीकचरा पेटवून तसेच डबे वाजवून शेतात येणाºया रानडुकरांना पळविण्याचे प्रयत्न शेतकºयांकडून करण्यात येत आहेत.अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाले आहे. त्यानंतर रब्बी हंगामात शेतात पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच रानडुकरांकडून फस्त करण्यात येत असल्याने, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतात पेरलेला हरभरा रानडुकरांपासून वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकून शेतकºयांना रात्रीच्यावेळी शेतात जागरण करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या शेतीला सामूहिकरीत्या संरक्षक कंपाउंड देण्याची उपाययोजना केली पाहिजे.-शिवाजीराव भरणे, शेतकरी,रामगाव, ता.अकोला.
११ एकर शेतात पेरलेला हरभरा उगवण्याआधीच रानडुकरांनी फस्त केला आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यानुषंगाने रानडुकरांमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.-सचिन गावंडेशेतकरी, केळीवेळी, ता.अकोट.