- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वन विभागाच्या आरक्षित जंगलामध्ये मुक्त संचार करीत असलेल्या वन्य प्राण्यांना ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य विषाणूंचा धोका होण्याची शक्यता लक्षात घेता, वन विभागाच्या लक्षात येताच वन विभागाच्या आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे जगभर थैमान माजले आहे. वीस लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोक या आजाराने ग्रासले आहेत. अशातच कोरोना या संसर्गाचा धोका वन्य प्राण्यांना होऊ शकतो, हे निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या वन विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी तातडीने पावले उचलत आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांना या संसर्गजन्य विषाणूपासून वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.याच आधारे जिल्ह्यातील आरक्षित जंगलांमध्ये वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथकच कडेकोट बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तात रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत.
जंगलांमध्ये ‘अलर्ट’ जारीदरम्यान, कोरोनापासून वन्य प्राण्यांच्या रक्षणासह वन तस्करांवर नजर ठेवण्यासाठी आता वन विभागाच्या जंगलामध्ये ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मे महिन्यापर्यंत हा अलर्ट राहणार असून, वन तस्करांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच या दरम्यानच कोरोनाची लागण वन्य प्राण्यांना होऊ नये म्हणून प्रत्येक गेटवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या वन्य प्राण्यांना संरक्षणासाठी प्रयत्नजंगलातील वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, हरीण, काळवीट यासह विविध वन्य प्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आली आहे. कोरोनाची लागण वन्य प्राण्यांना झाल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत.कोरोना या संसर्गजन्य विषाणूंपासून वन्य प्राण्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे जंगलातील बंदोबस्तही अधिक कडक करण्यात आला असून, वन्य प्राण्यांना संरक्षण पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. वाघ, बिबट, अस्वल यासह विविध वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी झटत आहेत.- विजय माने,उपवनसंरक्षक, अकोला वन विभाग.