------------------
अकोट येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकोट: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक बेफिकीर होऊन वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे प्रयत्नही अपुरे पडत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
------------------------
खिरपुरी : अतिक्रमण काढण्याची मागणी
खिरपुरी बु. : खांबदेव महाराज मंदिराजवळ गुरांसाठी पिण्याचे पाण्याचे हौद आहेत. या परिसरातच काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे गुरांना पाणी पाजण्यासाठी नेताना, अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
---------------------------
कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित!
दिग्रस बु. : परिसरात वीज बिल थकीत असणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे. शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत.
-------------------------
बांबर्डा-पुंडा रस्त्याची दुरवस्था!
रोहणखेड : बांबर्डा-पुंडा व रोहणखेड-कुटासा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-----------------------
वाडेगाव येथे मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या!
वाडेगाव : येथे गत काही वर्षांपासून कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाडा बंद असल्याने मोकाट गुरे रस्त्यावर थांबत असल्याने, नागरिक त्रस्त झाले आहेत. मोकाट गुरांचा ठिय्या रस्त्यावरच असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
------------------------
वीज पुरवठा खंडित; नागरिक त्रस्त
बाळापूर: तालुक्यातील गावागावातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनी मात्र वीज देयके देण्यात मात्र नियमित अग्रेसर आहे. गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.
-----------------------
पीक विम्यापासून शेतकरी वंचित
चिखलगाव : शासनाकडून पीक विमा व पंतप्रधान सन्मान निधी खात्यात जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा व सन्मान निधी जमा करण्यात आला नाही. शासनाने निधी खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-----------------------
कडोशी-निमकर्दा रस्त्याची दुरवस्था
बाळापूर : कडोशी-निमकर्दा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गाने शेगाव येथे पायी जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
--------------------------------
मजुरांची टंचाई, शेतकरी संकटात
बाळापूर : ग्रामीण भागात शेत मशागतीची कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत काडीकचरा वेचणीची कामे होत आहेत. कोरोनामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.