- राजेश शेगोकार
अकोला: पाने का सडली, घोडा का अडला अन् भाकरी का करपली या तिन्ही प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे न फिरविल्याने. वर्षानुवर्षापासून हे प्रश्न व त्याची उत्तरे प्रत्येक पिढीला सांगितली जातात. राजकारणात तर या प्रश्नोत्तराची नेहमीच चर्चा होते. कार्यकर्ते हे प्रश्न नेत्यांना विचारतात अन् नेते पुढच्या वेळी नक्की ‘फिरवू’ असे आश्वासन वेळ मारून नेतात. हाच खेळ कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षात सुरू असतो. काँग्रेस तर या खेळामध्ये चॅम्पियन आहे. भाकरी न फिरविल्यामुळेच आज अनेक मतदारसंघात काँग्रेसला नव्या भाकरीसाठी ‘नेतारूपी’ शिधाही मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे, तर इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सध्या राज्यभरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे पडघम जोराने वाजू लागले आहेत. सर्वच पक्षांनी कामाला लागत लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचच एक भाग म्हणून काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरू केली असून, या यात्रेचा चवथा टप्पा पश्चिम वºहाडात गेल्या तीन दिवसांपासून सुरू होतो. यावेळी अकोट येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती म्हणून पडलेल्या उमेदवारांना संधी देणार नसल्याचे सांगितले. या वक्तव्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जात आहे. अकोला जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर काँग्रेसला भाकरी फिरवणे सक्त गरजेचे झाले आहे. पाच विधानसभा मतदारसंघ असलेल्या अकोल्यात काँग्रेसचा आमदार कधी होता, हेसुद्धा आता कार्यकर्त्यांना लवकर आठवत नाही, तर लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसचे सुवर्णयुग कधीचेच संपले आहे. १९८४ मध्ये निवडून आलेले स्व. नानासाहेब वैराळे हे काँग्रेसचे शेवटचे खासदार. त्यानंतर या मतदारसंघावर भाजपाने निर्माण केलेले वर्चस्व काँग्रेसला स्वबळावर मोडून काढता आले नाही. या सर्व पृष्ठभूमीवर काँग्रेसची संघटना बांधणी अन् मतदारांवरील पकड दोन्हीही संपले आहेत, त्यामुळे नव्या तरुणांच्या हाती पक्ष सोपवून त्यांना उमेदवारीची संधी देण्याचाच प्रयोग किमान अकोल्यात तरी काँग्रेसच्या हिताचा आहे. ज्या मोदींच्या विरोधात काँग्रेस आता संघर्ष करीत आहे त्याच मोदींच्या गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व अगदी विधानसभा निवडणुकीतही पराभूतांसोबतच दमदार कामगिरी न करणाऱ्यांनाही उमेदवारी नाकारण्याची हिंमत केल्यामुळेच गुजरातमध्ये भाजपाची सत्ता कायम आहे. आता तोच धडा काँग्रेस गिरवित असेल तर किमान पक्षात कार्यकर्त्यांना नेता होण्याची संधी आहे या आशेने चैतन्य तरी निर्माण होईल.अकोला पश्चिमसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणीकाँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीमध्ये अकोला पश्चिम हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार दुसºया तर काँग्रेसचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळेल का, ही शंका असतानाही या मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, प्रदेश प्रतिनिधी मदन भरगड, मनपा गटनेता साजिदखान पठाण, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन अशा दिग्गजांची नजर या मतदारसंघावर आहे. तर दुसरीकडे मूर्तिजापूरसाठी फारशी दावेदारी दिसत नाही.येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी कायम राहणार आहे. त्यामुळे जुनेच सूत्र वापरले तर अकोला पश्चिम व मूर्तिजापूर हे दोन मतदारसंघ राष्टÑवादीच्या वाट्याला जातील असे दिसते. या दोन्ही मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले श्रावण इंगळे व उषा विरक हे आज दुसºया पक्षात आहेत, तर अकोला पूर्वमध्ये डॉ. संतोष कोरपे, अकोटात महेश गणगणे, बाळापुरात नातिकोद्दीन खतीब यांचा पराभव झाला होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याने गेल्या वेळी उमेदवार असलेल्या नेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या वेळी मोदी लाट असल्याने काँग्रेसमधील भल्याभल्यांची दांडी गूल झाली त्यामुळे यावेळी पुन्हा संधी मिळावी, असा प्रयत्न राज्यभरातील पराभूत उमेदवारांकडून नक्कीच होईल. अकोलाही त्याला अपवाद नाही; मात्र चव्हाण हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर अकोल्यातील विधानसभा मतदारसंघात इच्छुकांना उमेदवारीची संधी मिळू शकते. अकोटमध्ये पराभवानंतरही महेश गणगणे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सातत्य ठेवले त्यामुळे त्यांचा दावा कायम आहेच, तर दुसरीकडे बाळापुरात काँग्रेसमध्ये पकड निर्माण करणारे अॅड. खतीब यांनीही विधानसभेतील पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थात यश मिळविले आहे. त्यामुळे त्याच्या बळावर ते पुन्हा उमेदवारीसाठी प्रबळ दावा करू शकतात. या पृष्ठभूमीवर अकोट आणि बाळापूरमध्ये सातत्याने पराभवाला समोर जात असलेल्या गणगणे परिवार व खतीब परिवाराला थांबा देण्याची हिंमत खरेच अशोक चव्हाण यांच्यामध्ये आहे का, हाच प्रश्न आहे.खरे तर काँग्रेसच एवढी गलितग्रात्र झाली की पुन्हा जुन्यांना ताजेतवाने करण्यासाठी जुनेच औषध देण्यापेक्षा आता अशोकराव नवे औषध आणत असतील तर ते कडू असले तरी काँग्रेसजणांनी गोड मानून घेतले तर पक्षाला भविष्य आहे. असे झाले तर अकोला पूर्वमध्ये डॉ. पुरुषोत्तम दातकर, हेमंत देशमुख, रमेश म्हैसने, अकोटमध्ये संजय बोडखे, हिदायत पटेल, बद्रुजम्मा यांचीही दावेदारी प्रबळ राहणारच आहे. बाळापूरमध्ये डॉ. सुधीर ढोणे, प्रकाश तायडे अशा अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित होतील; मात्र राजकारणात कधी काय होईल, ते सांगता येत नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोकरावांनी अकोटात केलेली ही घोषणा प्रत्यक्षात आली तर ‘अशोका’च्या झाडाला यशाची फुले लागतील अन्यथा अशोकाचे झाड नुसतेच वाढते यावर हे वास्तव चव्हाण यांच्या ‘अशोक’ नावासोबत जोडल्या जाईल.