Mahadev Jankar ( Marathi News ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा पराभव झाला. ही निवडणूक त्यांनी परभणी लोकसबा मतदारसंघातून लढली. दरम्यान, आज जानकर यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं बोलताना पुढच्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढच्या निवडणुकीचा त्यांनी मतदारसंघच सांगितला आहे. पुढची २०२९ ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा महादेव जानकर यांनी केली.
यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले, पुढच्या निवडणुकीसाठी माझी आता बारामतीसाठी तयारी सुरू आहे. बारामती लोकसभा निवडणूक मी लढणार आहे. महाराष्ट्रातील मी पाच लोकसभा लढल्या आहेत. याआधी नांदेड, सांगली, माढा, परभणी, बारामती लोकसभा लढलो, पाचही ठिकाणी माझा पराभव झाला आहे. पण मतदान वाढत चाललं आहे, मतदान कमी झालं नाही, असंही महादेव जानकर म्हणाले.
"आज आमच्या पक्षाचा विधानसभेत आमदार आहे, विधान परिषदेत आमदार आहे. आपल्या पक्षाला मान्यता मिळत चालली आहे. विदर्भात आम्ही कमी आहे. गडचिरोलीला जिल्हा बँकेचा अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचा आहे, असंही महादेव जानकर म्हणाले.
पराभवाचं सांगितलं कारण
परभणी लोकसभा मतदारसंघातील पराभवावर बोलताना महादेव जानकर म्हणाले, परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाला असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. २०२४ ची लोकसभा निवडणूक महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून लढली आहे. त्यांत्याविरोधात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे संजय जाधव होते. त्यांचा विजय झाला आहे. दरम्यान, आता महादेव जानकर यांनी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.