अकोला:
जिल्ह्यातील बाळापुर मतदारसंघातील खारपाणपट्ट्यात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरणाऱ्या २२० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नागरिकांना पिण्यासाठी गोड पाणी उपलब्ध नसल्यामुळे येत्या १० एप्रिल पासून अकोला ते नागपूर पर्यंत पायदळ मोर्चा काढून टँकरद्वारे आणलेल्या खाऱ्या पाण्याने उपमुख्यमंत्र्यांची आंघोळ घालणार असल्याची माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी दिली.
बाळापूर विधानसभा संघातील बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश होतो. या भागात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे. गोड पाणी उपलब्ध नसल्यामुळे ६९ गावांमधील नागरिकांना किडनीचे विकार जडले असून त्यातच अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तेल्हारा तालुक्यातील वान धरणातून ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देत २२० कोटी रुपये मंजूर केले होते, अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली.
वर्तमान स्थितीत पाणीपुरवठा योजनेचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली. ही स्थगिती उठविण्यासाठी मी स्वतः अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय आमरण उपोषण छेडले होते. त्या उपोषणाची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधी पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती उठविणार असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार देशमुख यांनी यावेळी दिली. परंतु अधिवेशन संपल्यानंतरही उपमुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती हटविली नसल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, तालुका प्रमुख विकास पागृत, शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकोला पूर्व) राहुल कराळे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शरद तुरकर, गजानन चव्हाण, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, संजय अग्रवाल, सोनू भरकर, राजदीप टोहरे, अमित भिरड यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
२४० किलोमीटर चालणार पायी! खारपाणपट्ट्यातील नागरिकांसाठी पाण्याची नितांत गरज लक्षात घेता अकोला ते नागपूर २४० किमीचा प्रवास पायी करणार आहे. मोर्चामध्ये खारे पाणी भरलेल्या एका टँकरचा समावेश राहील. या टँकर मधील पाणी उपमुख्यमंत्र्यांनी पिऊन दाखवावे, अन्यथा त्यांना खाऱ्या पाण्याने आंघोळ घालण्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.
पाण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे हिंदुत्व आहे का? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील नऊ महिन्यांपासून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सर्वसामान्य जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे हेच भाजपाचे हिंदुत्व आहे का?, त्या भागातील सर्वधर्मीय नागरिक भारतीय नाहीत का?, असा सवाल आमदार देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.
अकोलेकरांच्याही पाणी आरक्षणाला स्थगितीशहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने वाण धरणातून अकोलेकरांसाठी २४ दलघमी पाण्याचे आरक्षण निश्चित केले होते. या आरक्षणाला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. या आरक्षणावरही भाजप लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारने ही स्थगिती न हटविल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.