अकोला: शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके आता कॅशलेश करण्याचा शासन विचार करीत असून, जीवन विमा निगम किंवा इतर खासगी कंपनीच्या माध्यमातून वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची रक्कम देण्याची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. सोमवारी शासनाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडील वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके प्रमाणित करण्याचा आदेश दिला होता; परंतु मंगळवारी लगेच हा आदेश मागे घेण्यात आला. यावर कायमस्वरूपी तोडगा आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक कॅशलेश करून देयकाची रक्कम शिक्षकांच्या थेट खात्यात जमा करण्याचा शासनाचा विचार आहे. राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय तपासणी समितीमार्फत शासनास सादर करण्यात येतात; परंतु ही देयके विभागीय स्तरावर तपासणी करताना एखाद्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याने शासकीय किंवा शासनमान्य रुग्णालयात उपचार घेतले असतील आणि देयक सादर करताना जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र जोडले नसेल, तर ही समिती त्रुटी काढून देयके परत पाठविते. यासंदर्भात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे शासनाने तातडीने जिल्हा शल्य चिकित्सकांचे अधिकार काढून घेत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राची गरज लागणार नसल्याचे स्पष्ट केले; परंतु एका दिवसातच हा निर्णयही शासनाने मागे घेतला. शासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार करीत आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके कॅशलेश करून देयकाची रक्कम थेट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असा विचार शासन करीत आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाचे काम जीवन विमा निगम किंवा इतर खासगी कंपनीस, त्यांच्याकडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देयके जमा करावी, असा शासनाचा विचार आहे. सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा शल्य चिकित्सकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी दिलेले अधिकार कायम ठेवले आहेत. शासनाने वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांकडून काढलेले अधिकार पुन्हा कायम ठेवण्यात आले आहेत. परंतु यापुढे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाचा व्यवहार कॅशलेश करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात देयकाची रक्कम थेट जमा होणार आहे. यासंबंधी निर्णय शासनाच्या विचाराधिन आहे. प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक
वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची रक्कम शिक्षकांच्या खात्यात थेट जमा होणार?
By admin | Published: April 12, 2017 9:41 PM