सचिन राऊत
अकोला : रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने यावर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अकोला जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यानुसार ६९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना या प्रकल्पाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून अपघातांची नोंद करण्यात येत आहे.
इंटिग्रेटेड रोड ॲक्सिंडेंट डेटाबेस प्रकल्पाची सुरुवात अकोला जिल्ह्यात करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एक मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून या अपच्या माध्यमातून अपघातांचा डेटा एकत्र करण्यात येत आहे. त्यानंतर हा डेटा एकत्रित करून आयआयटी चेन्नईद्वारा या अपघातांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ७२ अपघातांची नोंदणी यामध्ये करण्यात आली असून त्याची माहिती चेन्नई यांना देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रस्ते अपघात
वर्ष जखमी मृत्यू
२०१९ १७६ ९८
२०२० ११५ ५१
२०२१ ६०। ४१
६९ जणांना प्रशिक्षण
या प्रकल्पासाठी निवड झालेल्या प्रत्येक पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी व एका अधिकाऱ्यास एनआयसी मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ६९ अधिकारी कर्मचाऱ्यांना या प्रकल्पाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून आता अपघातांची नोंदणी आणि विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
७२ अपघातांची नोंदणी
अकोल्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर ३० जूनपर्यंत ७२ अपघातांची नोंदणी करण्यात आली आहे. या अपघाताचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून अधिकारी कर्मचारी अपघात कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत असल्याची माहिती आहे.
असे चालणार कामकाज
आयआरएडी या प्रकल्पाचे कामकाज असे चालणार आहे. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला आहे. तेथील दोन अधिकारी व एक पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळावर दाखल होतील. त्यानंतर अपघाताचे छायाचित्र, व्हिडिओ दिलेल्या ॲपवर अपलोड करतील. यासोबतच वाहनांची संपूर्ण माहिती चेसिस क्रमांक, वाहनाचा क्रमांक, चालकाचा परवाना व चालकाची संपूर्ण माहिती तसेच अपघात कोणत्या कारणामुळे घडला हे सर्व विश्लेषण करून संबंधित अधिकारी कर्मचारी ही माहिती ॲपवर अपलोड करणार आहेत.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर दोन फिल्ड अधिकारी आणि एका पोलिस अधिकाऱ्याची अशाप्रकारे एकूण तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपघातांची संपूर्ण माहिती एकत्रित करून ती ॲपवर पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर अपघाताचे तांत्रिक विश्लेषण चेन्नई येथून होणार आहे. अपघात कमी करण्यासाठी हा प्रकल्प आहे.
सुरेश वाघ
नोडल अधिकारी, अकोला