शासनाने बाजारपेठ, सिनेमागृह, जलतरण तलाव अशी गर्दीची ठिकाणे सुरू केली आहेत. मग शाळा का नाहीत? शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करावी, अशी मागणी करीत शिक्षक समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहे. काही ठिकाणी शिक्षक उपस्थिती ५० टक्के आहे तर काही ठिकाणी १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती आहे. अनेक सामाजिक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञ शाळा सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परंतु, तथाकथित अनेक समाजसेवक शिक्षकांनाच शाळा नको, अशी गरळ ओकण्यासाठी पुढे सरसावत आहेत; त्यातून शिक्षकांची बदनामी होत आहे. त्यामुळे आता तत्काळ शाळा उघडणे अत्यंत गरजेचे आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाला अनेकदा निवेदने दिली आहेत. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आदींच्या माध्यमातून आणि संपर्कातील विविध मान्यवरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना शीघ्रतेने शाळा सुरू करण्यासाठी विनंती वजा मागणीचे पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहेत.
विद्यार्थी, पालक, शिक्षकांना आवाहन
प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पोस्ट कार्ड खरेदी करून जास्तीत जास्त पोस्ट कार्ड मुख्यमंत्री महोदयांना पाठवावे. असे आवाहन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय टोहरे, शिक्षक नेते गोपाल सुरे, जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, जिल्हा सरचिटणीस राजेश देशमुख, कार्याध्यक्ष अरविंद गाडगे आदींनी केले आहे.