अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरकुलांची बांधकामे तातडीने आणि दर्जेदार करण्यासाठी बचत गटांची मदत घेणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली.जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि पारधी आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी नोंदणीकृत महिला व पुरुष बचत गटांची मदत घेण्यात येणार आहे. बचत गटांमार्फत करण्यात येणाऱ्या घरकुलांच्या बांधकामांसाठी प्रत्येक गटात दोन सुशिक्षित बेरोजगार, दोन मिस्त्री, दोन मजूर, चार हेल्परचा समावेश असणार आहे. यामुळे घरकुलांची बांधकामे तातडीने व दर्जेदार होणार असून, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कामे करण्यासाठी स्पर्धा होणार असून, लाभार्थी गरिबांना चांगली घरे उपलब्ध होतील. मंजूर घरकुलांची बांधकामे येत्या १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी सांगितले.घरकुल कामांचे असे आहे उद्दिष्ट!जिल्ह्यात २०१६ ते २०१९ या तीन वर्षांत प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत १८ हजार ८३६ घरकुलांचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १८ हजार ४१ घरकुले मंजूर असून, १ हजार २९९ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत ८ हजार ९२ घरकुलांचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ७ हजार ८०२ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार ९६६ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. शबरी आवास योजनेंतर्गत ९९७ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६१५ घरकुले मंजूर असून, २६६ घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर पारधी आवास योजनेंतर्गत ३७४ घरकुलांचे उद्दिष्ट असून, १५९ घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.जिल्ह्यात मूलभूत सुविधांची कामे होणार!शासनाच्या महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावांच्या सर्वंकष विकासासाठी १८ प्रकारच्या मूलभूत सोयी-सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पिण्याचे पाणी, शाळा, अंगणवाडी, विद्युत व्यवस्था, अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, पोहोच रस्ते, समाजमंदिर, गावठाण जागा, सांडपाणी व्यवस्थापन, गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बाजार जागा, आरोग्य सेवा, स्वच्छता, खेळाचे मैदान व घरकुल इत्यादी कामांचा समावेश आहे. सोयी-सुविधांसंदर्भात तक्रार निवारणासाठी तक्रार कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचेही ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी सांगितले.