अकोला: इच्छाशक्ती, आत्मविश्वास व कामाप्रती प्रामाणिकता असेल तर काहीही अशक्य नसल्याचे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी दाखवून दिले आहे. उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकार्यांची पदे रिक्त असताना प्रशासनाचा एकहाती किल्ला लढविणार्या आयुक्तांच्या कामकाजाची गती पाहता अवघ्या महिनाभरातच शहर विकासाची गाडी सुसाट निघाल्याचे दिसून येत आहे. विकास कामे करताना प्रशासनाला विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आयुक्तांना अक ोलेकरांची साथ मिळणे गरजेचे झाले आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ.लक्ष्मीकांत देशमुख,चंद्रशेखर रोकडे यांच्यानंतर शहरातील विकास कामांप्रती इतर वरिष्ठ अधिकार्यांमध्ये धोरणात्मक दृष्टिकोनाचा अभाव पहावयास मिळाला. दर्जाहीन रस्त्यांवर वारंवार खडीकरण, डांबरीकरण करणे, सिमेंट रस्त्यांवर डांबरीकरण करणे, धार्मिक उत्सवांदरम्यान रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपयांची कामे होत असल्याचा आजवर अकोलेकरांना अनुभव आहे. हीच परिस्थिती जलप्रदाय विभागाच्या बाबतीत असून, नादुरुस्त हातपंप, सबर्मसिबल पंपाची वारंवार दुरुस्ती करणे, जाणीवपूर्वक जलवाहिनीसाठी पीव्हीसी पाइपचा वापर करून कोट्यवधी रुपयांची देयके लाटण्याचे उद्योग करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत सर्वपक्षीय नगरसेवकांची कंत्राटदार व मनपा अधिकार्यांसोबत गट्टी जमल्याची वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही. परिणामी शहर विकास कामांपासून कोसो दूर असल्याचे जळजळीत सत्य आहे. या सर्व परिस्थितीला छेद देण्याचे काम आयुक्त अजय लहाने यांनी चालविल्याचे तूर्तास दिसत आहे. लहाने यांनी मनपाच्या आयुक्त पदाची धुरा ७ सप्टेंबर रोजी स्वीकारली असली तरी उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकार्यांची सर्वच पदे रिक्त असल्याने एकटे आयुक्त काय करू शकतील, अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ८ ऑक्टोबर रोजी आयुक्तांना एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. कामाप्रती प्रामाणिकता, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असेल तर काहीही शक्य असल्याचे आयुक्तांच्या केवळ एक महिन्याच्या कृतीमधून दिसत आहे.
विद्युत पोल, रोहित्रांची समस्या निकाली
रस्ते रुंदीकरणासाठी सर्वात मोठा अडथळा रस्त्याच्या मधोमध असणार्या विद्युत पोल आणि रोहित्रांचा होता. ही बाब जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, आयुक्त लहाने यांच्या लक्षात येताच त्यांनी महावितरण कंपनीला निर्देश दिले. कंपनीनेदेखील होकार देत, विद्युत पोल हटविण्याला प्रारंभ केला. बंद पथदिव्यांची समस्या लक्षात घेता आयुक्तांनी पथदिव्यांचा प्रभागनिहाय कंत्राट रद्द करून झोननिहाय काम सुरू केले. नागरिकांच्या तक्रारीसाठी मनपात नियंत्रण कक्षाचे गठन केले.
पाणीपुरवठय़ाचा प्रयोग सुरू
जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा न करता थेट मुख्य जलवाहिनीद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा बंद करून तो यापुढे जलकुंभाद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे शेवटच्या घटकापर्यंंत पाणी पोहोचणार असून, जलवाहिनींचे जाळे टाकण्याचे काम सुरू होईल.
जिल्हाधिकारी-आयुक्तांचा सूर जुळला
शहरातील समस्यांची जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना जाण आहे. समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचे चांगलेच सूर जुळले असून, ही बाब शहरासाठी शुभसंकेत मानल्या जात आहे. रस्त्यांचे ह्यवर्किंंग एस्टिमेटह्णबदलले मनपाला प्राप्त निधीतून सात सिमेंट रस्त्यांचे काम सुरू होणार होते. प्रमुख रस्त्यांचे आयुर्मान किमान २५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असण्याचा आग्रह धरीत आयुक्त अजय लहाने यांनी ऐनवेळेवर सिमेंट रस्त्यांचे वर्किंंग एस्टिमेटमध्ये बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. जे रस्ते १८ ते २0 फूट रुंदीचे होणार होते, ते ३0 ते ४0 फूट रुंद केले जातील.