शरद देशमुख / कार्ली (जि. वाशिम) : कार्ली येथील पाटील कुटूंबियांत पुर्वीपासूनच अठराविश्व दारिद्रय. अशातच अवघ्या १८ व्या वर्षी पोटच्या पोरीला (कल्पना) कर्करोगाने ग्रासले. गाठीशी असलेली पै अन् पै तिच्या उपचारावर खर्च करुनही शेवटी नियतीने तिला यमसदनी धाडलेच. इथपर्यंतच हा खेळ थांबला नाही; तर उघड्या स्मशानात तिच्यावर अंत्यसंस्कार करताना सरणावर चक्क आभाळ कोसळले. धो-धो पावसात सरण पेटविण्याकरिता नियतीपुढे हतबल झालेल्या कुटूंबाची धावपळ पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. दलित कुटूंबात जन्माला आलेल्या कल्पना मधुकर पाटील या अभाग्या मुलीच्या नशिबी आलेली ही फरपट वाढलेल्या सामाजिक समस्या उजागर करणारी ठरली आहे. कर्करोगाने मृत्यूमुखी पडलेल्या कल्पना पाटीलवर ५ आॅगस्टला अंत्यसंस्कार करण्यात आले. यादिवशी परिसरात जोराचा पाऊस सुरु होता. सरणावर तिच्या मृतदेहाभोवती रचण्याकरिता सुकी लाकडं मिळाली नाहीत. त्यामुळे ओलीच लाकडं रचून रॉकेलच्या आधारे अग्नि देण्यात आला. मात्र, वरुन कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याने सरणावरची आग वारंवार विझत होती. या दुहेरी संकटाने मरणानंतरही कल्पनासोबत नियतीने मांडलेला खेळ पाहून अंत्यसंस्काराला आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून आपसूकच अश्रू ओघळले. तथापि, जीवनातील त्रिकालाबाधित सत्य असणारा मृत्यू अन् त्यानंतर करावा लागणारा अंत्यविधी तरी किमान सुसह्य व्हायला हवा, अशी प्रत्येकाचीच मनिषा असते. मात्र, कार्लीच नव्हे; तर जिल्ह्यातील इतरही अनेक गावांमध्ये टिनशेडअभावी उघड्यावरच अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. याप्रती गावपुढाऱ्यांनी सामाजिक जाणीवेतून पुढाकार घेत स्मशानभूमी सुधार मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी यानिमित्ताने सर्वच स्तरातून जोर धरत आहे.
‘कल्पना’ नसताना सरणावरही कोसळले आभाळ!
By admin | Published: August 07, 2015 1:20 AM