तब्बल सहा किलो गाजासह ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनी परिसरात एक महिला घरातून अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकून महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून सुमारे सहा किलो गांजासह ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवनी येथील रहिवासी अमिनाबी अब्दुल गफार ही महिला तिच्या घरातून अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह सापळा रचून तसेच पाळत ठेवून महिलेला गांजा विक्री करताना रंगेहात ताब्यात घेतले. तिच्याकडून सुमारे सहा किलो गांजा व रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा व अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असतानाही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे या कारवाईवरून समोर आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी गत काही काळात जिल्हाभर कारवायांचा धडाका लावला असून गांजा विक्री तसेच भांग विक्री, अमली पदार्थ व जुगार अड्ड्यांवर छापेमारी करीत अवैद्य धंदेवाल्यांना सळो की पळो केले आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. या महिलेला ताब्यात घेतले असून तिच्या विरुद्ध एनडीपीएस ॲक्ट अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.