गोळ्या, इतर सामग्री जप्त: ‘पीसीपीएनडीटी’ पथक, अन्न व औषध विभागाची कारवाईअकोला : मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी अवैध गर्भपात केंद्र आणि बोगस डॉक्टरांविरुद्ध ‘पीसीपीएनडीटी’ कार्यक्रमांतर्गत धडक मोहिमा सुरू असून, यानुषंगाने जिल्ह्यात गठित विशेष पथकाने बुधवारी युसुफ अली खदान परिसरात रहिमोन्निसा बेगम मो. याकुब या महिलेकडून मिजोप्रॉस नामक गर्भपाताच्या गोळ्यासह इतर सामग्रीचा अवैध साठा जप्त केला. कोणताही परवाना नसताना सदर महिला या गोळ्या विकत होती.शहरातील खदान परिसरात कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण न घेतलेली एक महिला अवैधरीत्या गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या गोळ्या विकत असल्याची आॅनलाइन व लेखी अशा दोन्ही स्वरूपातील तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीपीएनडीटी पथकाने बुधवारी दुपारी खदान परिसरातील या महिलेच्या घरी छापा टाकला. यावेळी तेथे मिजोप्रॉसच्या चार गोळ्या आढळून आल्या, तसेच गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणारी साधनसामग्रीही जप्त करण्यात आली. कारवाईसाठी विशेष पथकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. याबाबत खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. अन्न व औषधी विभागाचे निरीक्षक डॉ. प्रशांत अस्वार, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील विधी समुपदेशक अॅड. शुभांगी खांडे, उमेश ताठे यांनी ही कारवाई केली. शहरातील दुसरी कारवाईपीसीपीएनडीटीने कारवाई करून गर्भपाताच्या गोळ्या पकडण्याची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी पथकाने सापळा रचून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत सुनील निचळ नामक आरोग्य सहायकास गर्भपाताच्या गोळ्या अवैधरीत्या विकताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी त्याचा साथीदार गजानन ढोके यालाही अटक केली. महिला करते आयाचे कामगर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध साठा बाळगणारी महिला एका स्त्रीरोग तज्ज्ञाच्या रुग्णालयात कामावर आहे. तेथे ती गत अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. ती केवळ नववी पास असून, तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान नाही किंवा गोळ्या बाळगण्याचा परवाना नाही. तरीही महिला गर्भपाताच्या गोळ्या विकत असल्याचे आढळून आले.
गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या महिलेस पकडले!
By admin | Published: April 06, 2017 1:35 AM