लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार/अकोला : पिवळ्या विषारी ‘घाेणस अळी’ने पूर्व विदर्भानंतर आता पश्चिम विदर्भात शिरकाव केला असून, वाशिम जिल्ह्यातील माळशेलू येथील महिला रविवारी शेतात काम करीत असताना या अळीने तिला डंख मारला, यामुळे त्या महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
विदर्भातील काही भागांत सोयाबीनवर घोणस नावाच्या बहुभक्ष्यी विषारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बांधावरील गवत, एरंडी, आंबा झाडे व फळपिकावर ती आढळून येत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, ही अळी वाशिम जिल्ह्यातील साेयाबीन पिकावर माेठ्या प्रमाणावर आढळून आली आहे. या अळीच्या अंगावरील बारीक काट्यांत विषग्रंथी असून, तो काटा माणसाच्या त्वचेत टोचून अळी विषारी रसायन शरीरात सोडते. त्यामुळे त्वचेवर परिणाम होऊ लागतो. तसेच बेशुद्धही पडू शकताे.