रायखेड येथील सीमा गजानन वानखडे (४५) ही महिला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान इंधन आणण्याकरिता घराजवळील परिसरात गेली होती. या ठिकाणी विद्युत तारा तुटलेल्या होत्या. त्यावेळी विद्युत तारांना हाताचा स्पर्श होऊन सीमा वानखडे यांना विजेचा धक्का बसला. यावेळी गावकऱ्यांनी धाव घेतली. महिलेला ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जात असताना वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे शवविच्छेदन करून ग्राम रायखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महिलेच्या पश्चात दोन मुले, पती असा परिवार आप्त परिवार आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत. मृतक महिलेच्या नातेवाईकांनी तुटलेल्या विद्युत तारांबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली नाही, असा आरोप केला आहे.
जि. प. सदस्य संजय अढाऊ यांची तक्रार
मृत सीमा वानखडे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून ही महिला मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवित होती. महावितरणच्या हलगर्जीमुळे महिलेला जीव गमवावा लागला. शासनाने त्वरित मदत द्यावी व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी कार्यकारी अभियंता अकोट यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.
मृतक महिलेच्या कुटुंबाला तत्काळ वीस हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळून येतील. त्यांच्यावर कारवाई करून मृताच्या कुटुंबीयांना महावितरणकडून आर्थिक मदत दिली जाईल.
- दीपक राठोड, उपकार्यकारी अभियंता, तेल्हारा