अकोटः येथील एका महिलेला प्रसूतीसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी प्रसूतीयोग्य सुविधा नसल्याचे सांगून डॉक्टरांनी अकोला येथे रेफर करण्याचे सांगितले, परंतु अकोला येथे पोहोचण्यापूर्वी महिलेची रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती झाली. डॉक्टरविना प्रसूती झालेल्या महिलेने मुलाला जन्म दिला. सुदैवाने दोघेही मायलेक सुखरूप आहेत. ही घटना सोमवार, १९ जुलै रोजी तांदुळवाडी फाट्याजवळ घडली. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभार समोर आला.
अकोट येथील एक महिला पती व नातेवाइकासोबत ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आली होती. या ठिकाणी उपस्थिती असलेल्या डॉक्टराने प्रसूतीची योग्य व्यवस्था नसल्याचे सांगून पुढील उपचारासाठी अकोला रेफरचा मेमो दिला. प्रसूतीसाठी दोन दिवसांचा वेळ असल्याचाही सल्ला देण्यास ग्रामीण रुग्णालय विसरले नाही. दरम्यान, रुग्णवाहिकेमध्ये महिलेला पती व कुटुंबातील महिला अकोला जाण्यास निघाले. दरम्यान, अकोट-अकोला मार्गावर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. रुग्णवाहिकेमध्ये डाॅक्टर उपलब्ध नसताना तांदुळवाडी फाट्यानजीक घरच्या महिलांनी प्रसूतीसाठी काळजी घेतली. सुदैवाने महिला व चिमुकला मुलगा सुखरूप आहे. प्रसूतीनंतर परत अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना अकोला रेफर करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे.