अनीस शेख
महान : अकोला-दिग्रस मार्गावर महान बस थांब्याजवळ अकोला-दिग्रस एसटीतून गर्भवती महिलेने चालत्या एसटीतच पुत्राला जन्म दिला. एसटी कर्मचारी आणि महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने गर्भवती महिलेला तत्काळ सुविधा मिळाल्या. त्यामुळे महिला आणि पुत्र सुखरूप आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाची अकोला-दिग्रस दिशेने जाणारी एसटी बस प्रवाशांना घेऊन मार्गाने जात असताना याच बसमध्ये (बेलगाव, ता. यवतमाळ) गर्भवती महिला प्रवास करीत होती. तिला प्रवासात प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. याबाबत वाहनचालकास माहिती मिळताच त्याने प्रसंगाचे गांभीर्य ओळखत एसटी बस सरळ महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. तेथे तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र राठोड, परिचारिका ए. के. पवार यांनी तत्काळ एसटीमध्ये धाव घेऊन महिलेची पाहणी केली. त्यानंतर त्या महिलेची तत्काळ प्रसूती करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्यात आले व बसमध्येच या महिलेची प्रसूती करण्यात आली. या महिलेने एका गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला. आई व बाळ सुखरूप असल्याचे कळताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी अब्दुल कुद्दुस, संतोष घुले, अब्दुल सादीक, एचएलएल मनीषा यांनी सहकार्य केले. (फोटो)