येथील बाळापूर मार्गावरील एका घरामध्ये विठ्ठल जाधव हे कुटुंबासह भाड्याने राहतात. खोलीतील कूलरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने कूलरने पेट घेतला. त्यामुळे खोलीतील दिवाण-गादीने पेट घेतला. यात कपड्यांसह घरातील धान्य आणि घरात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली. या वेळी घरात महिला व तिची लहान मुलगी होती. जीवाची पर्वा न करता महिलेने घरातील साहित्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. यात महिलेच्या पायाला व हाताला दुखापत झाली. महिलेचा आरडाओरडा ऐकून जागेचे मालक घाटोळसह सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम कळसकर, चेतन दशमुखे, सरपंच मंगेश तायडे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन टँकर मालक सुनील मानकर यांना संपर्क करून लागलेल्या आगीची माहिती दिली. टँकरमधील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. आगीत अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, भाजलेल्या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.
फोटो :