लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : पाच वर्षांपूर्वी धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शस्त्रक्रिया शिबिरामध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही महिला चार महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार शनिवारी खडकी (जाम) येथे समोर आला आहे.खडकी येथील एका महिलेने पतीच्या सल्ल्यानुसार आरोग्य विभागाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोव्हेंबर २०१५ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली होती. ही शस्त्रक्रिया डॉ. विजय जाधव यांनी केली होती. याच दिवशी ११ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पाच वर्षानंतर महिलेला मासिक पाळी येत नसल्याने त्यांनी अकोला येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरकडे तपासणी केली. सोनोग्रॉफी अहवालानुसार सदर महिला ही चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दाम्पत्य गोंधळून गेले. मूल पाहिजे नसल्यामुळे दोघेही पती-पत्नी विवंचनेत सापडले आहेत. या दाम्पत्यास दोन मुले असून, एक ७ वर्षाचा तर दुसरा ५ वर्षाचा आहे. गंभीर बाब म्हणजे डॉक्टरांच्या चुकीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे या कुटुंबासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. याप्रकराची आरोग्य प्रशासनाने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी या दाम्पत्याने केली आहे.शस्त्रक्रियेदरम्यान १ हजार केसेसमधून एक-दोन शस्त्रक्रिया अयशस्वी होतात. त्यामुळेच हा प्रकार घडला असावा. या दाम्पत्याने गर्भपात करायचा की नवजात शिशुला जन्म द्यायचा, हे ठरवावे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर शासकीय मदत देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविता येईल.- डॉ. विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, पातूर
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतरही महिला गर्भवती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 10:24 AM