अकोला : अकाेला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील कर्तबगार महिलांना शनिवारी (८ जुलै) येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या रंगारंग सोहळ्यात ‘लोकमत वुमेन ॲचिव्हर्स अवॉर्ड २०२३’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमातच ‘लोकमत वुमेन ॲचिव्हर्स अवॉर्ड कॉफी टेबल बुक'चे प्रकाशन करण्यात आले.
महामार्गावरील बाळापूर नाका परिसरातील हाॅटेल व्हीएस इम्पेरियल येथे दुपारी चार वाजात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून मराठीतील ख्यातनाम अभिनेत्री धनश्री कडगांवकर यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा, मुख्य प्रायोजक पूनम ज्वेलर्सचे नंदकुमार आलिमचंदानी, कालुराम फुडसचे सिद्धार्थ रुहाटिया उपस्थित होते. मंचावर लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड अलोककुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतरप्रियंका जोशी यांच्या शिष्यांनी बहारदार कथ्थक नृत्य सादर करत गणेश वंदना केली. कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रास्ताविकातून 'लोकमत वुमन ॲचिव्हर्स अवाॅर्ड'ची भूमिका विषद केली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मनोगत व्यक्त करत पुरस्कार विजेत्या महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अकाेला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील कर्तबगार महिलांचा लोकमत अचिव्हर्स अवार्ड २०२३ देऊन गाैरव करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन निशाली पंचगाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन अदिती कुलकर्णी यांनी केले.
महिला मल्टिटाक्सरच नव्हे तर मॅनेजमेंट गुरूसुद्धा आहेत
प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये पुरूषांच्याही पुढे जात महिला काम करीत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये महिलाच टॉपर ठरत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई, लोकमाता अहिल्या, माता रमाई यांनीही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने समाजाला दिशा दिली. एक महिलासुद्धा तिच्या कुटूंबाला, मुलांना दिशा देण्याचे काम करते. महिला आता केवळ मल्टिटाक्सरच राहिल्या नाहीत तर खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट गुरूसुद्धा झाल्या आहेत. अशा शब्दात चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी कर्तृत्वान महिलांचा गौरव केला.
यांचा झाला सन्मान
आशा राऊत, अनुजा सावळे पाटील, अर्पणा डोंगरे, डॉ. अपर्णा कुटे, अर्चना राऊत, अर्चना व्यवहारे, अश्विनी तहकीक, भारती खुरद, डॉ. छाया महाजन, दीपा पाटील, गीता कटारिया, जयश्री दुतोंडे, कल्पना धोत्रे (तिरुख), कल्याणी पुराणिक, कविता कोसरवाल, कोकिळा तोमर, लता तायडे, मोनाली गावंडे, नंदाताई पाऊलझगडे, निता बिडवे (जाधव), नीता खडसे, नीतिशा कोठारी, पूनम पाटोळे, पूनम राठोड, डॉ. प्रवीणा शहा, डॉ. पूजा खेतान, रुची गुप्ता, रूपा पलन, प्रा.डॉ.संगीता पवार (काळणे), सविता भांबुरकर (ढाले), सविता वड्डे, स्मिता म्हसाये-ढोले, सोनी आहुजा, सुनीता गीते, डॉ. स्वाती चांदे, डॉ. श्वेता अग्रवाल (सारडा), डॉ. उत्पला मुळावकर, डॉ.वैशाली देवळे, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, योगीता पावसाळे यांना 'लोकमत वुमन ॲचिव्हर्स अवाॅर्ड २०२३' ने सन्मानित करण्यात आले.