अकोला : पत्रकार परिषदेला अर्धा तासाने विलंबाने आल्यानंंतर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांसोबत अरेरावीची भाषा करीत, व्हिडिओ रेकाॅर्डिंग करणाऱ्या एका पत्रकाराचा मोबाइल हिसकावल्याचा प्रकार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घडला. या प्रकाराचा उपस्थित पत्रकारांनी निषेध केला.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ३ मे रोजी अकोला दौऱ्यावर आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाविषयक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार नियोजित वेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेला उपस्थित होते; मात्र नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उलटल्यानंतरही महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर पत्रकार परिषदेला आल्या नाही. पत्रकार परिषद सुरू करण्यास विलंब होत असल्याने पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, सभागृहाबाहेर जात असताना, ना. ठाकूर सभागृहात आल्या. पत्रकार परिषद आहे, मला माहीत नव्हते, महिला व बालविकास विभागासंदर्भात बैठक सुरू होती. त्यामुळे पत्रकार परिषद सुरू करण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताना, तुम्ही बातमी घेतली नाही तरी चालेल, अशी भाषा करीत महिला व बालविकास मंत्री पत्रकारांशी बोलत होत्या.
यासंदर्भात पत्रकारांसोबत त्यांचा वाद सुरू असताना, व्हिडिओ रेकाॅर्डिंग करणाऱ्या एका पत्रकाराच्या हातातील मोबाइल फोन महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी हिसकावून घेतला. व्हिडिओ रेकाॅर्डिंग करताना पत्रकाराचा मोबाइल हिसकावला. या प्रकाराचा उपस्थित पत्रकारांकडून निषेध करण्यात आला. काही वेळानंतर महिला व बालविकास मंत्र्यांनी हिसकावून घेतलेला मोबाइल संबंधित पत्रकारास परत करण्यात आला. दरम्यान, पत्रकारांसोबत वाद सुरू असताना, अशा प्रकारामुळे अकोला बदनाम आहे, अकोल्यात कोणी येत नाही, योजनांसाठी निधी मिळत नाही, अशा शब्दांत ना.ठाकूर यांनी अनुद्गार काढले. त्यांच्या या वक्तव्याचाही पत्रकारांनी निषेध नोंदविला.
मला पत्रकार परिषदेच्या वेळेबाबत माहिती नव्हती त्यामुळे गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. मी तिथेच पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
- ना.यशाेमती ठाकूर