लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वाडेगावातील अंगणवाडी केंद्रालगत होत असलेल्या वादग्रस्त दारू दुकानाबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांनी सोमवारी रात्री उशिरा धाव घेतली. यावेळी तक्रारकर्त्या महिलांना रात्रीचा अंधार आणि पावसात होत असलेल्या चौकशीबाबत संशय आल्याने त्यांनी सोनकुसरे यांना घेराव घातला.वाडेगाव गावाच्या हद्दीत तामशी रोडवर अंगणवाडी केंद्रालगतच दोन दारू दुकानांना विरोध असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी २४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. गट क्रमांक २३३४ मध्ये प्लॉट क्रमांक-८ व ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक ४५७१ या जागेमध्ये जगदीश मन्साराम लोध, श्यामलाल मन्साराम लोध यांची दोन दारूची दुकाने स्थलांतरित केली जात आहेत. त्या ठिकाणी म्हणजे, तामशी रोड येथील गट क्रमांक २३३४ मध्ये शासकीय अंगणवाडी मंजूर आहे. त्या अंगणवाडीच्या बांधकामासाठी २० जानेवारी २०१६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी आठ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या बाबी अहवालात नमूद आहेत. त्यातही अंगणवाडी आणि दारू दुकानांचे अंतर केवळ ११ मीटर आहे. नियमाप्रमाणे ते किमान १०० मीटर असावे; मात्र तरीही दुकानांना परवानगी दिली जात आहे. त्यासाठी सातत्याने चौकशी केली जात आहे. त्यासाठीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांना मागवला. चौकशीसाठी सोनकुसरे यांनी विस्तार अधिकारी अनिस अहमद यांच्यासह सोमवारी सायंकाळी गावात धाव घेतली. चौकशीबाबत महिलांना संशय आल्याने त्यांनी सोनकुसरे यांना घेराव घातला. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. महिलांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना दूरध्वनी केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांची बाजू ऐकत निर्णय घेण्याचे सांगितले. पोलीस बंदोबस्तात सोनकुसरे यांना रस्त्यापर्यंत रवाना करण्यात आले. यावेळी तक्रारकर्त्या सुमन नागे, निर्मला नागे, नर्मदा नागे, अंजना गोरे, निर्मला ठोंबरे, मंदा काकड, तिवसा गवळी, संगीता इंगळे, वर्षा भोरे, महानंदा सरप, वैशाली सरप, प्रतिभा कळम, ज्ञानेश्वर नागे, अनंता भोरे, सुनील काकड, केशव गवळी, गजानन ठोंबरे, राजू सरप, रमेश नागे, संजय शर्मा, संतोष इंगळे, अनिता इंगळे, सूर्यकांता सरप यांच्यासह शेकडो नागरिक जमा झाले होते.खासगी गाडीचा वापरविशेष म्हणजे दारू दुकानांना परवानगी देण्याच्या संवेदनशील मुद्द्याची चौकशी करण्यासाठी सोनकुसरे यांनी शासकीय गाडीऐवजी खासगी गाडीचा वापर केला. तेही रात्रीच्या अंधारात पाऊस सुरू असताना त्यांनी चौकशी केल्याने ग्रामस्थांना संशय आल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. आडसूळप्रमाणेच न्याय द्या!जिल्हाधिकाऱ्यांनी आडसूळ येथील वस्तीतील दुकानाची दखल घेत परवानगी नाकारली, तोच न्याय वाडेगावातील दुकानासाठीही देण्याची मागणी यावेळी महिलांनी लावून धरली.
महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: July 04, 2017 2:40 AM