लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : येथून जवळच असलेल्या चिंचोली रुद्रायणी येथील २५ वर्षीय विवाहितेने गावाजळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेची माहिती मिळताच पतीनेही राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पतीवर सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू आहेत.चिंचोली रुद्रायणी येथील शीतल सुनील सिरसाट या विवाहितेने गावाजवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच सुनील देवराव सिरसाट यांनी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने सुनील सिरसाट यांना सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले.घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, तसेच महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बार्शीटाकळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी संत गाडगे बाबा आपत्कालीन पथकाला पाचारण केले. पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी हृषीकेश तायडे, सुरज ठाकूर, अंकुश सदाफळे, ज्ञानेश्वर वेरुळकार, धीरज आटेकर, अक्षय वानखडे, गोविंदा ढोके आदींनी शोध मोहीम राबवून दीड तासात महिलेचा मृतदेह बाहेर काढला.बार्शीटाकळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. (वार्ताहर)
पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:48 PM