- राहुल सोनोने लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु : चांगले उत्पादन होईल, या आशेने कृ षी सेवा केंद्रातून उधारीत बियाणे आणून पेरणी केली. दमदार असलेली पिके काढणीला आलेला असताना परतीचा पाऊस झाला. या पावसाने होत्याचे नव्हते केले. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला जागेवरच कोंब फुटले. ही विदारक स्थिती पाहून दिग्रस बु. येथील महिला शेतकरी जिजाबाई त्र्यंबक गवई या ५ नोव्हेंबर रोजी दुपारी शेतातच बेशुद्ध पडल्या होत्या. पिकाची झालेली अवस्था पाहून उधारीसह कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न दिग्रस बु. परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.दिग्रस बु. येथील गोपाळ त्र्यंबक गवई यांच्याकडे ५ एकर शेती आहे. त्यांनी कृषी सेवा केंद्रातून ५५ हजारांचे खत, बियाणे, औषधी उधारीत पेरणी केली होती. पाच एकरात त्यांनी सोयाबीन, कपाशी लावली होती. गोपाल गवई यांचा उदरनिर्वाह पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. शेती मशागतीसाठी खर्च लागला. पिके चांगल्या स्थितीत असल्याने त्यांना उधारीसह कर्ज फेडू अशी आस होती; मात्र गेल्या २० दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोंगलेले सोयाबीन त्यांना घरी आणता आले नाही. सोयाबीनची सोंगणी करून त्यांनी शेतातच जुळ््या लावल्या होत्या. दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने मंगळवारी जिजाबाई गवई या आपल्या मुलाबरोबर शेत पहायला गेल्या होत्या. तेथे सोयाबीनला फुटलेले कोंब पाहून त्या जमिनवर बेशुद्ध होऊन कोसळल्या. तर पिकाची स्थिती पाहून गोपाळ गवई यांच्या डोळ्यात पाणी आले. आधीच पिकासाठी कर्ज झालेले असताना त्यांना आईवर उपचार करावे लागले. उत्पन्न झाले नसल्याने मुलांचे शिक्षण, घर खर्च कसा भागवावा असा प्रश्न गवई कुटुंबासमोर पडला आहे. गवई यांना दरवर्षी दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पादन होत होते. यावर्षी परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.उपचारासाठीही पैसे नव्हतेशेतातील पिकांची नासाडी पाहून जिजाबाई गवई यांना भोवळ आली. त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारासाठी गोपाळ गवई यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे उसणे घेऊन त्यांनी आईवर उपचार केले. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे न करता तातडीने मदत देण्याची गरज आहे.
लोकमत बांधावर : सोयाबीनला कोंब पाहून महिला शेतकरी बेशुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 10:30 AM