नीलिमा शिंगणे - जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात असहकार आंदोलन पेटत होते. १९२0 च्या असहकार चळवळीत अकोला शहरातील प्रतिष्ठित व संपन्न घराण्यातील महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. यातील अनेक महिलांना कारावास भोगावा लागला. ‘इंग्रजानो, चालते व्हा! ’व ‘करा अथवा मरा’ या निर्धाराने परकीय सत्तेशी अकोल्यातील महिला स्वातंत्र्य सैनिक लढल्या.विदर्भात दुर्गाताई जोशी समाजसेवेचे कार्य करीत होत्या. दुर्गाताईंनी महिलांमध्ये जागृती निर्माण करू न, त्यांना प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत आणले. कमलाबाई भागवत, मनुताई कोल्हटकर, गंगूबाई बापट, सरस्वताबाई गोयनका या शिक्षित घराण्यातील महिलांनी १९२0 च्या असहकार चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला. दुर्गाताई जोशी सबंध जिल्हय़ात नव्हे, तर विदर्भभर प्रचार करीत होत्या. १९३0 साली त्यांच्या जोडीला ओक घराण्यातील राधाबाई ओक, प्रमिलाताई ओक, सुशीलाबाई ओक या जिल्हाभर व्याख्यानांद्वारा प्रचार करीत होत्या. रमाबाई केळकर, उमाबाई मराठे, सुभद्राबाई जोशी यांनी प्रचार कार्य केले. १९३0 च्या कायदेभंग चळवळीत या महिलांनी ६ ते ९ महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या होत्या. सुमारे ४५ महिला कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष कारावासाच्या शिक्षा झाल्या. महिला स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीत अकोला जिल्हा हा विदर्भात आघाडीवर आहे. प्रमिलाताई ओक यांच्या नेतृत्वात १९३९ व १९४१ साली प्रभात फेर्या, त्याचप्रमाणे युद्धविरोधी प्रचार महिला करू लागल्या. ताराबेन मश्रुवाला या १९३0, १९३२, १९४0 आणि १९४२ या प्रत्येक लढय़ात आघाडीच्या लढाऊ नेत्या होत्या. राधादेवी गोयनका १९४२ साली १५ दिवस स्थानबद्ध होत्या. सावित्रीबाई बियाणी यांचेही योगदान या लढय़ात महत्त्वपूर्ण राहिले. १९३0-३२ च्या कायदेभंग चळवळीच्या काळात या महिलांनी पाउसपाणी, चिखलाची पर्वा न करता खेडोपाडी जाऊन प्रचारकार्य केले. संसार व मुला-बाळांची जबाबदारी असतानाही देश स्वातंत्र्याकरिता त्यांनी संसाराची पर्वा केली नाही. यापैकी रमाबाई केळकर, उमाबाई मराठे, उमाबाई खपली, रुक्मिणीबाई गोयनका, सरस्वतीबाई मेहरे, सुभगाबाई काशीकर या महिलांचे पतीही कायदेभंग चळवळीत होते. त्यांनीही कारावास भोगला.१९४२ च्या चळवळीत अनसूयाबाई भोपळे व विमलाबाई देशपांडे यांच्या अल्पवयीन मुलीदेखील आपल्या आईबरोबर तुरुंगात होत्या. त्यांचे पतीही तुरुंगात होते. त्याचप्रमाणे प्रेमाबाई अनिस, सुशीलाबाई खत्री, प्रमिलाताई ओक यांचेही पती १९४२ च्या ‘चले जाव’च्या चळवळीत आघाडीवर होते. यासाठी पती-पत्नी दोघांना तुरुंगवास भोगावा लागला.८ ऑगस्ट १९४२ रोजी संपूर्ण स्वातंत्र्यासाठी अंतिम लढा देण्याची घोषणा काँग्रेसने केली. इंग्रजांनो, चालते व्हा! व करा अथवा मरा, या निर्धाराने परकीय सत्तेशी शांततामय मार्गाने लढा द्या, हा महात्मा गांधींचा संदेश होता. अकोला शहरात ऑगस्ट क्रांतीचा पहिला जबरदस्त क्रांती उठा प्रमिलाताई ओक यांच्या नेतृत्वाताखाली महिलांनी केला. आम्ही स्वतंत्र झालो आहोत, ही घोषणा करू न तिरंगा राष्ट्रीय झेंडा सरकारी इमारती व सर्वत्र फडकविण्याचा कार्यक्रम ठरला होता. काँग्रेस मैदानावर पोलिसांनी ताबा घेतला होता. तेथील राष्ट्रीय झेंडा काढून टाकण्यात आला होता. त्याच मैदानावर आपला स्वातंत्र्याचा प्रतीक राष्ट्रीय झेंडा फडकविण्याच्या कार्यात काँग्रेसचे जहाल पुढारी व अकोला राष्ट्रीय शाळेचे संस्थापक बापूसाहेब सहस्त्रबुद्धे सर्वांच्या पुढे होते. पोलिसांनी त्यांना मारपीट करू न तुरुंगात रवानगी केली. त्याचवेळी १३ ऑगस्टला दुपारी ३ वाजता प्रमिलाताई ओक यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा प्रचंड मोर्चा चालू होता. प्रमिलाताईंच्या नेतृत्वात शंभरच्यावर महिला राष्ट्रीय झेंडा खांद्यावर घेऊन चालत होत्या. जवळपास दहा हजारांचा जनसमुदाय या क्रांतिकारी महिलांच्या पाठीशी होता. इंग्रजांनो चालते व्हा, करेंगे या मरेंगे व इन्क्लाब जिंदाबाद या घोषणांनी आसमंत दुमदुमला. सशस्त्र पोलिसांचे लाठीधारी जथ्थे मोर्चाच्या मागे पुढे होते. हा मोर्चा अडविण्याची हिंमत पोलिसांना झाली नाही. तिकडे काँग्रेस मैदानावर बापूसाहेबांना बेदम मारपीट होऊन अटक झाल्याची बातमी महिलांच्या मोर्चाकडे आली. जनसमुदाय खवळला. घोषणांचे आवाज वाढले. खवळलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला अडविणे पोलिसांना शक्य वाटत नसावे, म्हणून त्यांनी एकदम लाठी हल्ला केला नाही. काँग्रेस मैदानाभोवती पोलिसांचे मोठे कडे होते. मोर्चाच्या आघाडीवर असलेल्या महिलांनी पोलिसांचे कडे तोडून मैदानात प्रवेश केला. पोलिसांनी लाठी मार सुरू केला. खांद्यावरील झेंडा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीतही मैदानात झेंडा लावण्याचा प्रयत्न महिलांनी केला. प्रमिलाताई ओक आणि विमलबाई देशपांडेंसह दहा-पंधरा महिलांना पोलिसांनी बेदम मारले. पोलिसांनी अटक केली. तुरुंगात रवानगी केली. काँग्रेस मैदान ते कोतवालीपर्यंत व पलीकडे वाशिम स्टॅण्डपर्यंत पोलीस व जनतेत तुंबळ युद्ध सुरू झाले.