वाडेगाव : गावातून हद्दपार झालेले देशी दारूचे दुकान पुन्हा गावात थाटू नये, यासाठी वाडेगावातील वॉर्ड क्र. एकमधील महिलांनी रात्रभर जागरण केले. एवढेच नव्हे, तर दुकान सुरू करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही पिटाळून लावले. बंद झालेले दारूचे दुकान पुन्हा सुरू होऊ न द्यायचा निर्धार या महिलांनी केला आहे. प्रशासनाला निवेदन देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या महिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते.शासन निर्णयानुसार, गतवर्षी वाडेगावातील वॉर्ड क्र. एकमधील दारूचे दुकान गावाबाहेर गेले होते. यावर्षी नियम शिथिल झाल्याने पुन्हा जुन्याच जागेत दुकान स्थलांतरित करण्याचा निर्णय दुकान मालकाने घेतला आहे. याची माहिती मिळताच या भागातील महिलांनी २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अकोला यांना निवेदन देऊन दुकान पुन्हा सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची साधी दखलही घेतली नाही. दुकानदारास जुन्याच जागेत दुकान स्थलांतरित करण्यास परवानगीही दिली. दुकान मालकाने १५ मे रोजी जुन्या जागेत दारूचा माल घेऊन काही कर्मचारी आले होते. याची माहिती महिलांना मिळताच त्यांनी जुन्या दुकानाच्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी त्यांनी दारूचे बॉक्स घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. ते पुन्हा येऊन दुकान थाटू नये, यासाठी या महिलांनी रात्रभर तिथे धरणे दिले. एवढेच नव्हे, तर या महिलांनी रात्रभर जागरण केले. कुठल्याही स्थितीत हे दुकान जुन्या जागेत सुरू होऊ न देण्याचा निर्धार या महिलांनी केला आहे. त्यासाठी उपोषण करण्याचा इशाराही या महिलांनी दिला आहे. (वार्ताहर)फोटो आहे