लोकमत न्यूज नेटवर्कवरूर जऊळका : येथील देशी दारूचे दुकान व गावातील गावठी दारू विक्री बंद करण्याची मागणी गावातील महिलांनी १४ जुलै रोजी संबंधितांना निवेदन देऊन केली आहे.सदर निवेदनामध्ये त्यांनी गावामध्ये परवाना नसलेले देशी दारूचे एक दुकान आहे, तसेच गावामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारूदेखील विकली जाते. ही दुकाने राजरोसपणे सुरू आहेत, यामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. युवक मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेले आहेत. गावातील काही युवक, वृद्ध पुरुष कामधंदा सोडून देशी दुकानावर जाऊन दारू पितात. यामुळे यांच्या घरातील महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, तसेच देशी दारूचे दुकान हे बस स्टँडच्या बाजूलाच असल्याने दारू पिणारे लोकबस स्टँडवर जाऊन अश्लील शिवीगाळ करतात. त्यामुळे बस स्टँडवर असणाऱ्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे या दुकानापासून शाळा जवळ असल्याने दारुड्यांचा त्रास विद्यार्थ्यांना होण्याची भीती महिलांनी व्यक्त केली. गावातील महिलांचे संसार सुरळीत चालावेत, यासाठी येथील महिलांनी देशी दारू दुकान व गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी ठाणेदार दहीहांडा, उपविभागीय अधिकारी अकोट, एसडीपीओ अकोट, तहसीलदार अकोट, ग्रामपंचायत वरूर, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना सदर निवेदन दिले आहे. यावेळी गावातील बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती.
वरूर जऊळका येथे दारू बंदीसाठी महिलांचा एल्गार
By admin | Published: July 17, 2017 3:01 AM