चोहोट्टा बाजार ग्रामसभेत महिलांची प्रचंड गर्दीचोहोट्टा बाजार : राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत दारू दुकांनाना सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर ‘आता परिसरातच दारूचे दुकाने नको’ या मागणीसाठी चोहोट्टा बाजार येथील महिलांनी ग्रामपंचायतवर सोमवारी मोर्चा काढला. स्वयंस्फूर्तीने निघालेल्या या मोर्चाने महाराष्ट्रदिनी आयोजित चोहोट्टा बाजार ग्रामपंचायतची ग्रामसभा अनेक मुद्यांवर गाजली. सभेच्या अध्यक्ष सरपंच नीता दिलीप वडाळ, उपसरपंच ऊर्मिल मालवे, ग्रामविकास अधिकारी भुजिंगराव शिवरकार व सहकारी सदस्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे समाधान केले. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक युवकही दारूच्या आहारी जात आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमीच अशांतता पसरते, अशा अनेक बाबींनी त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी ग्रामसभेत दारूचे दुकान आपल्या परिसरात कुठेच नको, या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामध्ये आपल्या व्यथा व्यक्त केल्या. चोहोट्टा ग्रामपंचायतच्या हद्दीत दारू दुकान उभारणीस तीव्र विरोध करून ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करून घेतला. यावेळी दारूबंदी विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत महिलांनी घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये गावातील शेकडो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला. सकाळपासूनच या मोहिमेच्या यशस्वितेसाठी तरुणांनी स्वाक्षरी अभियान राबविले आणि दुकानांना आपला विरोध दर्शविला. तर तीव्र आंदोलनाची तयारी आपल्या गावाच्या हद्दीत कुठेही दारूचे दुकान उभे राहू नये, ही आमची रास्त मागणी आहे आणि या महत्त्वपूर्ण विषयाचा ठराव आज ग्रामसभेत मंजूर करावा, अशी मागणी मोर्चात आलेल्या महिलांनी रेटून धरली. तसेच गरज भासल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
ग्रामपंचायतचा ऐतिहासिक ठराव मोर्चेकरांच्या दारूबंदीच्या व जिल्हा परिषदच्या जागेवर ग्रामपंचायतच्या देखरेखेखाली व्यापारी संकुल बांधण्याचा ठराव या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतच्या या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करताच उपस्थित मोर्चेकरांनी ग्रामपंचायतचे आभार मानले. आता मनमानी पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे.