अकोला : देशातील महिलांचे मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे सांगत महिलांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन पुणे येथील रोहिणी टेकाडे यांनी मंगळवारी येथे केले.भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील अशोक वाटिका येथे आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. जगात सर्वप्रथम स्त्री-पुरुष समानतेचा संदेश तथागत गौतम बुद्ध यांनी दिला, असे सांगत २५ डिसेंबर १९२७ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मनुस्मृती’चे दहन करून देशातील समस्त स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले, असे त्या म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांच्या आधारे महिलांनी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन रोहिणी टेकाडे यांनी केले. भारिप-बमसं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, वंदना वासनिक, रेखा अंभोरे, अॅड. धनश्री देव, किरण बोराखडे, आशा अहिरे, इंदू भड, आशा इंगळे, सरला मेश्राम, लक्ष्मी सरिसे, आशा एखे, सूर्यकांत घनबहादूर, सुवर्णा जाधव, संगीता खंडारे, सुनंदा चांदणे, पार्वती लहाने, शोभा आठवले, हिना चौधरी, सुनीता रंगारी, मनीषा मते, विद्या अंभोरे, कविता राठोड, सुषमा कावरे, माजी मंत्री डॉ. डी. एम. भांडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, अॅड. संतोष रहाटे, रामा तायडे व गजानन गवई उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक प्रतिभा अवचार यांनी केले. संचालन शोभा शेळके तर आभार मंगला सिरसाट यांनी मानले. स्त्री मुक्ती परिषदेला जिल्ह्यातील भारिप-बमसं महिला आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्ता महिला उपस्थित होत्या.परिषदेत ११ ठराव मंजूर!स्त्री मुक्ती परिषदेत ११ ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन जाहीर करावा, आरक्षणावर गदा आणणाऱ्या व्यवस्थेचा निषेध, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला शासनाच्या ई-क्लास जमिनीचा ताबा देण्यात यावा, स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचा त्वरित थांबवावे, फुले-आंबेडकरी चळवळीत जात-भाषेचा वापर न करणे, ‘आरएसएस’च्या शस्त्रपूजेवर बंदी घालावी, कोरेगाव-भीमा प्रकरणाचे सूत्रधार मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे, बहुजन वर्गाला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध कराव्या, आदिवासींना ई-क्लास जमीन हक्क देण्यात यावे व अकोला मनपाचा अवाजवी कर त्वरित रद्द करावा इत्यादी ठरावांचा समावेश आहे.