लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोरगाव मंजू येथील देशी, विदेशी दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी दारूबंदी महिला संघर्ष समितीच्या महिलांनी गुरुवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आणि पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक राजेश कावळे यांच्याकडे गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, बोरगाव मंजू येथील राष्ट्रीय महामार्गालगतची देशी, विदेशी दारूची दुकाने, बार बंद झाले; परंतु या बार मालकांनी, दारू दुकानदारांनी राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरपेक्षा अधिक अंतरावर गावातील लोकवस्तीमध्ये देशी, विदेशी दारूची दुकाने सुरू केली. मद्यपींमुळे महिला, युवतींची छेडखानी होत आहे. दारूमुळे महिलांवर अत्याचार वाढून कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने बोरगाव मंजू येथील देशी, विदेशी मद्य विक्रीची दुकाने, बार, बीअर शॉपी बंद करावी, त्यासाठी गावात मतदान घ्यावे, अशी मागणी महिलांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक राजेश कावळे यांच्याकडे केली. यावेळी अधीक्षक कावळे यांना २२४ महिलांच्या स्वाक्षरींचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये सरपंच साधना मुरलीधर भटकर, वैशाली मोहोड, वर्षा चक्रनारायण, पुष्पा दळवी, शोभा वानखडे, छाया निवाणे, पार्वताबाई इंगळे यांचा समावेश होता. ठिय्या आंदोलनामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
दारूबंदीसाठी महिलांचा ठिय्या
By admin | Published: June 30, 2017 1:12 AM