- संतोष येलकरअकोला - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अभियान अंतर्गत जिल्हयात दोन वर्षांपासून कामापासून वंचित असलेल्या महिला वर्धिनींच्या हाताला काम देण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हयातील महिला वर्धिनींनी ‘थाळी बजाव ’ आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला वर्धिनींच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासह महिलांचे समूह तयार करण्याचे काम करण्यात आले. या समूहाच्या माध्यमातून ग्रामसभा, प्रभागसंघ तयार करण्यात आले. परंतु, गेल्या २०१८ मध्ये जिल्हयात नियुक्त करण्यात आलेल्या महिला वर्धिनींना अभियानाच्या माध्यमातून कामे देण्यात आली नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हयातील महिला वर्धिंनींच्या हाताला काम देण्यात यावे, या मागणीसाठी एल्गार पुकारित जिल्हयातील महिला वर्धिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाव’ आंदोलन करून मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या ग्राम विकास मंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ‘उमेद’ अभियानाच्या जिल्हा समन्वयक तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या थाळी बजाव आंदोलनात उमा महल्ले, वर्षा पातुरे, दुर्गा नकासकर, मीना नकासकर, उषा खोसे, कांता गाडे, संध्या वानखडे, संगीता डोंगरे, रूपाली घाडगे, जयश्री अढाऊ, रेखा घाटे, विद्या मानकर, शारदा फाटकर, ज्योती इंगळे, पूजा निकाडे, मिरा जावळे, पूजा अवचार, माया दंदी, सुचिता घोगरे, अर्चना गायकवाड, निर्मला भगत, वर्षा बावस्कर, माया ढोरे, माधुरी आठवले, सुप्रीया वानखडे, अरुणा ठोसर, सीमा उजगरे, लिना दामोदर, सुवर्णा लोड यांच्यासह जिल्हयातील महिला वर्धिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
‘थाळी बजाव’ ने दणाणला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर !‘उमेद’ अभियानातील महिला वर्धिनींच्या ‘थाळी बजाव ’ आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. तसेच या आंदोलनाने नागरिकांचेही लक्ष वेधले .