अकोला : स्थानिक चित्रकला महाविद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थी श्रद्धा जोध आणि जाकीर यांच्या अप्रतिम पेन्टिंग्सने रविवारी अकोलेकरांना भुरळ घातली. अकोला आयएमए हॉलमध्ये सकाळी १०.३० वाजतापासून तर रात्री ८ वाजतापर्यंत सुरू असलेल्या या हस्तकला विक्री प्रदर्शनाला जवळपास दोन हजार रसिकांनी भेट देऊन दिव्यांग कलावंतांचे कौतुक केले.रविवारी सकाळी या दिव्यांग आर्ट गॅलरीचे उद्घाटन डॉ. उज्ज्वला मापारी यांच्या हस्ते झाले. यावेळी लायन्स क्लबचे पराग शहा, दिव्यांग राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय बरडे, आर्ट गॅलरी प्रकल्पाचे प्रा. विशाल कोरडे, अनुलोमचे गजानन भांबुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. अनुलोम अकोला, नॅब अकोला, अहनद अपंग कल्याण संस्था आणि रिसोर्स सेंटर फॉर इन्स्टिट्यूट एज्युकेशन, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी-अधिकारी संघटना, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पुढाकाराने या आर्ट गॅलरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शन व विक्रीच्या आर्ट गॅलरीत जवळपास २०० हून अधिक कलावंत सहभागी झाले होते.दिव्यांगांनी तयार केलेल्या पेन्टिंग्स, मूर्ती, लेदर बॅग, शिल्प कला, शोभिवंत वस्तू, शिवणकला, पर्यावरणपूरक पत्रावळी, विविध खाद्यपदार्थ, मसाले, कापडी पिशव्या, लिफाफे आदी अनेक वस्तू या प्रदर्शनात ठेवल्या होत्या. श्रद्धा आणि जाकीर या दोन कलावंतांच्या पेन्टिंग्सला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद लाभला. श्रद्धाच्या धार्मिक पेन्टिंग्सने आणि जाकीरच्या चार्लीच्या पेन्टिंग्सला रसिकांनी विशेष पसंती दर्शविली. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विशाल कोरडेंसह प्रसन्न तापी, गौरी शेगोकार, सुनीता पाटील, अंकुश काळमेघ, विवेक तापी, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या नयना धोत्रे, आणि समाजसेवी संस्थांनी परिश्रम घेतले.मान्यवरांची हजेरी व खरेदीदिव्यांगाच्या या प्रदर्शनादरम्यान शहराचे आमदार गोवर्धन शर्मा, उपविभागीय महसूल अधिकारी संजय खडसे, सुप्रसिद्ध चित्रकार सतीश पिंपळे, डॉ. सुभाष भडांगे, भाजपचे हरीशभाई आलिमचंदानी या मान्यवरांनी भेट देऊन दिव्यांग कलावंतांचे कौतुक करीत येथे खरेदी केली. आमदार शर्मा यांनी श्रद्धाच्या पेन्टिंग्स तर आलिमचंदानी यांनी जाकीरच्या पेन्टिंग्सची खरेदी केली. हजारो रुपयांचे कलाकृती आणि साहित्य येथून विकल्या गेले.