संतोष येलकर
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेरपर्यंत राज्यात ७ हजार ६७१ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून, सद्य:स्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांत ३० हजार ४७२ हजार सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत.
सिंचन सुविधांमध्ये वाढ व्हावी, यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे करण्यात येतात. या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींच्या कामांसाठी साहित्य आणि मजुरीचा खर्च भागविण्याकरिता प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. उपलब्ध अनुदानाच्या रक्कमेतून शेतकऱ्यांकडून सिंचन विहिरींची कामे केली जातात. २०२०-२१ या आर्थिक वर्षात गत एप्रिल ते डिसेंबरअखेरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ७ हजार ६७१ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून, राज्यातील विविध जिल्ह्यांत सद्य:स्थितीत ३० हजार ४७२ सिंचन विहिरींची कामे सुरू असून, लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
७६७१ विहिरींच्या कामांवर
३२.५२ कोटी रुपयांचा खर्च !
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत राज्यात सात हजार ६७१ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर अनुदानापोटी ३२ कोटी ५२ लाख ३० हजार रुपयांचा शासनामार्फत खर्च करण्यात आला. असे रोहयो राज्य आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.