अकोला : शाळा दुरुस्तीच्या कामासाठी निधीच उपलब्ध नसणे, तसेच कामांची अंदाजपत्रके तयार नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाची काम वाटप सभा मंगळवारी ऐनवेळी बारगळली. अंदाजपत्रके तयार झाल्यानंतरच काम वाटप करा, असा पवित्रा सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, नोंदीत कंत्राटदारांनी घेतल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली.बांधकाम विभागाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्यासह कंत्राटदार सभेला उपस्थित होते. यावेळी तीन लाखांच्या आतील खर्चाची ४५ कामे वाटप करण्यासाठी होती. त्यामध्ये शिक्षण विभागाच्या शाळा दुरुस्तीच्या २० कामांसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे निधीच उपलब्ध नाही. जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध केला जातो. येत्या काळातील निवडणुकीची धामधूम पाहता ही कामे निधी उपलब्ध झाल्यानंतरच करण्याचा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला. सोबतच इतर कामांची अंदाजपत्रके संबंधित बांधकाम उपविभागांनी तयार करणे आवश्यक आहे; मात्र ती अंदाजपत्रके तयार नसल्याने पुढील कामात अडचणी येऊ शकतात. कामांची अंदाजपत्रके आधी तयार करावी, त्यानंतरच काम वाटप करावे, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. पंधरा दिवसात ती घेतली जाण्याची शक्यता आहे.