तेल्हारा, दि. १६- दोन बाल कामगारांना कामावर ठेवणार्या तेल्हारा शहरातील एका फर्निचर दुकानात १६ फेब्रुवारी रोजी अकोला येथील जिल्हाधिकारी पथकाने धाड टाकली. यावेळी दोन बाल कामगार काम करीत असल्याचे आढळल्याने दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १४ वर्षा आतील बालकांना कामावर ठेवण्यास बाल कामगार प्रतिबंधक नियमन कायद्यानुसार गुन्हा आहे. परंतु, तेल्हारा शहरात काही व्यापारी बाल कामगारांकडून काम करून घेत असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हाधिकार्यांच्या पथकाने गुरुवारी तेल्हारा येथे धाड टाकली. या धाडीदरम्यान तेल्हारा शहरातील संत तुकाराम चौकातील महाराष्ट्र फर्निचर येथे बाल कामगार शे. सलमान शे. आरीफ, शे. रिजवान शे. आरीफ हे काम करीत असताना आढळले. हे दुकान हुसेनखान आलमखान रा. सात्काबाद तेल्हारा यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले. त्यामुळे अकोला येथील कामगार अधिकारी श्रीहरी मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुसेनखान आलमखान यांच्याविरुद्ध बालकामगार प्रतिबंधक नियमन कायदा १९८६ नुसार कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने आलेल्या पथकात प्रवीण कथे, योगेश मोडक, एम. डी. अंकुश, वि.श्री. जोशी, विनोद पाचपोहे, डॉ. एम. व्ही. फुलवंदे, श्याम राऊत, प्रदीप टाक यांचा समावेश होता. पुढील कार्यवाही ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनात गणपत गवळी, नागोराव भांगे, सुरेश काळे करीत आहेत.
बाल कामगारांकडून काम; व्यापा-याविरुद्ध गुन्हा
By admin | Published: February 17, 2017 2:50 AM