- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असलेले ग्रामीण भागातील रस्ते निर्मितीची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याचा सपाटा राज्य शासनाने लावला; मात्र त्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करणे, दर्जाबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात घडत आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या १७ पैकी किती रस्त्यांची कामे पूर्ण झाली, मुदतीत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, याची माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात दडवून ठेवण्याचा प्रकार घडत आहे.राज्यातील ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी २ लाख ३६ हजार ८९० किमी आहे. त्यापैकी २ लाख ३ हजार ९९४ किमीचे रस्ते प्रत्यक्ष उपयोगात आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ३० हजार किमी रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी दिली जात आहे. अकोला जिल्ह्यातील १७ रस्त्यांच्या १११.९० किमीच्या कामाला ९ आॅक्टोबर २०१८ रोजी ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली. तसेच पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीही केली जाणार आहे. ती कामे नोव्हेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते; मात्र त्यापैकी अनेक कामे मुदतीनंतरही अपूर्ण आहेत. येत्या जूनअखेरपर्यंतही पूर्ण होणार की नाही, याची खात्रीही नाही.मुदतीत कामे न करणाºया कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्याची आहे. याबाबतची माहिती या दोन्ही कार्यालयातील संबंधितांकडून दडवून ठेवली जात आहे. माहिती घेण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा कुणीही गेल्यास तेथे जबाबदार अधिकारी उपस्थितच नसतात.नोव्हेंबर २०१९ पर्यंतच्या मुदतीची कामेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१८ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमध्ये अकोला तालुक्यातील सिसा बोंदरखेड ते सांगळूद, भौरद ते मोरगाव (भाकरे), काजळेश्वर ते तामशी, पिंजर ते भेंडी काजी, राज्य महामार्ग ते कवठा, हातरूण ते मालवाडा, राज्य महामार्ग ते बहादुरा, कुरूम ते कवठा सोपीनाथ, राष्ट्रीय महामार्ग ते राजनापूर खिनखिनी जिल्हा सीमेपर्यंत, राष्ट्रीय महामार्ग ते जाम ते सावरखेड, चौफुली ते सावरखेड, बोर्डी- शिवपूर-राहणापूर, वणी-वारुळा-खापरवाडी, बाभूळगाव-वरूड वडनेर, वाकोडी फाटा ते वाकोडी रस्ता, वाडी अदमपूर ते जाफ्रापूर-दहीगाव रस्ता, मुंडगाव-हिलालाबाद रस्ता ही कामे आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अपूर्ण; कारवाईला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:10 PM