अकोला: शासनाने भव्य सांस्कृतिक भवन मंजूर करून त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला. रामदासपेठेतील क्रीडा संकुलच्या जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्यास सुरुवात झाली. भवनाचे ८0 टक्के काम पूर्ण झाले; परंतु निधीअभावी कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून देत, गाशा गुंडाळला. सध्या सांस्कृतिक भवनाचा परिसर बेवारस असून, परिसरात अनेक अवैध धंदे चालत आहे. सांस्कृतिक भवनाचे रखडलेले काम सुरू करण्याविषयी जिल्हा प्रशासन ढिम्म आहे.शहरामध्ये सांस्कृतिक भवन उभे राहावे यासाठी अनेक वर्षांपासून नाट्य कलावंत, नाट्य संस्था मागणी करीत होत्या. त्यासाठी कलावंतांनी आंदोलन केले. शासनाकडे पाठपुरावा केला. अथक परिश्रमानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने अद्ययावत व आधुनिक सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. रामदासपेठेतील क्रीडा संकुलाच्या १ लाख २९ हजार चौ. फूट जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्यावतीने बांधकामासाठी निविदा बोलावून, नांदेडच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात आला. या कंपनीने बांधकामाला सुरुवात केली. कंत्राटदाराने सांस्कृतिक भवनाचे ८0 टक्के काम पूर्ण केले; परंतु सद्यस्थितीत सांस्कृतिक भवनातील अंतर्गत काम, इमारतीची रंगरंगोटी, परिसरात पेव्हर्ससह बगिचा, दिवाबत्ती आदी कामे रखडली आहेत. निधीची कमतरता असल्याने, नांदेडच्या कंत्राटदाराने काम सोडून दिले असून, तेथील गाशाही गुंडाळला आहे. त्यामुळे सांस्कृतिक भवनाचा परिसरात बेवारस असून, या ठिकाणी दिवसा व रात्रीला अवैध धंदे चालत असल्याची माहिती आहे. परिसरात मोठ्या महागड्या मार्बल, संगमरवरी दगड बेवारस पडून असून, त्याची चोरी होत आहे. एवढेच नाही तर परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, बांधकाम केलेली इमारत भकास होत आहे. सांस्कृतिक भवनाचे निधीअभावी काम रखडले असून, हे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन व क्रीडा संकुल समितीने पाऊले उचलण्याची गरज आहे.सांस्कृतिक भवनाबाबत नाट्य कलावंत, संस्था उदासीन!शहरात अद्ययावत सांस्कृतिक भवन उभे राहावे यासाठी नाट्य कलावंत, संस्थांनी हा मुद्दा रेटून धरला होता. सांस्कृतिक भवनाचे ८0 टक्के काम पूर्ण झाले; परंतु निधीअभावी भवनाचे काम थांबले आहे. कंत्राटदार काम सोडून निघून गेला; परंतु काम का थांबले, याविषयी नाट्य कलावंत, नाट्य संस्था, अ.भा. मराठी नाट्य परिषद प्रशासनाला जाब विचारत नाहीत, याचेच आश्चर्य वाटते. आता सांस्कृतिक भवन उभे राहिले खरे; परंतु भवनाचे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी एकही नाट्य संस्था पुढे येत नाही. एकंदरीतच नाट्य कलावंत, नाट्य परिषदेची भूमिका उदासीन असल्याचे दिसून येते.जलतरण तलावाचेही काम रखडले!क्रीडा संकुल परिसरात सांस्कृतिक भवनासोबतच शासनाच्यावतीने जलतरण तलावही उभारण्यात येणार होता. तसा कंत्राटदारासोबत करारसुद्धा झाला होता; परंतु १५ कोटी रूपयांचा निधी सांस्कृतिक भवनावरच खर्च झाला. त्याही भवनाच्या अंतर्गत कामालाही निधी कमी पडला. त्यामुळे जलतरण तलावाच्या कामालाच सुरुवात झाली नाही. त्यामुळे जलतरण तलावाचे कामसुद्धा रखडले आहे.
काही तांत्रिक मंजुरीअभावी सांस्कृतिक भवनाचे काम थांबले आहे; परंतु बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळाल्यावर काही दिवसातच भवनातील अंतर्गत काम सुरू होईल आणि अकोलेकरांना सांस्कृतिक भवन अर्पण केल्या जाईल.-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती