अकोला : जिल्ह्यात खारपानपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे पाणी सोडले जाते. त्यामुळे होणारी पाण्याची प्रचंड नासाडी थांबविण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणापासून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यापर्यंत २३ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याची नासाडी सुरूच आहे. त्यानुषंगाने जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील अकोला तालुक्यातल्या खारपानपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी महान धरणातून काटेपूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे सोडण्यात येणारे पाणी खांबोरा जवळील उन्नई बंधाऱ्यात साठविण्यात येते आणि बंधाऱ्यातून योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीपात्रात पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची होणारी नासाडी रोखण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत काटेपूर्णा नदीच्या काठाने २३ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याच्या योजनेला शासनामार्फत २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. तीन वर्षे उलटून गेली. मात्र, अद्यापही जलवाहिनी टाकण्याचे कामपूर्ण झाले नाही. त्यामुळे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे उन्नई बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याची होणारी नासाडी सुरूच आहे. त्यानुषंगाने धरणातून उन्नई बंधाऱ्यात जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
१९.५० कोटी रुपयांची योजना
केव्हा होणार पूर्ण?
महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याची योजना तीन वर्षांपूर्वी शासनामार्फत मंजूर करण्यात आली. त्यासाठी १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, जलवाहिनी टाकण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने, ही योजना पूर्ण होणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नदीपात्राद्वारे पाणी सोडल्याने
अशी होते पाण्याची नासाडी !
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी निम्मे पाणी जमिनीत मुरते तसेच अनेक ठिकाणी नदीकाठी मोटारपंप लाऊन पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते.
महान येथील काटेपूर्णा धरणातून उन्नई बंधाऱ्यात जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. धरणाच्या ठिकणी जलवाहिनी जोडणीचे काम होणे बाकी आहे. तसेच जलवाहिनीद्वारे बंधाऱ्यात पाणी सोडण्याची चाचणी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. धरणाच्या ठिकाणी जलवाहिनीची जोडणी व चाचणी घेण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.
-विवेक सोळंके,
अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, मजीप्रा.