अकोला : निधी उपलब्ध असताना, गत दोन वर्षांपासून रखडेले शहरातील नेकलेस रस्त्याचे काम केव्हा सुरू करणार, अशी विचारणा खासदार संजय धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी करताच, नेकलेस रस्त्याचे काम सोमवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी खडसावल्यानंतर नेकलेस रस्त्याचा रेंगाळलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शहरासह जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रामुख्याने आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, महागरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उप विभागीय अधिकारी संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन नाठक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात उपस्थित होते.शहरातील सिव्हिल लाइन ते दुर्गा चौक या ८१६ मीटर लांबी व १५ मीटर रुंदीच्या ‘नेकलेस’ रस्ता कामासाठी शासनामार्फत नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. रस्ता कामाची निविदा काढण्यात आली; मात्र दोन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू का करण्यात आले नाही, असा सवाल खा.संजय धोत्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना केला. या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे काम बाकी असल्याने रस्त्याचे काम सुरू होणे बाकी असल्याचे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी दिले. त्यावर खा.धोत्रे, आ.बाजोरिया,आ.सावरकर, आ.शर्मा यांनी या मुद्यावर कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले व काम केव्हा सुरू होणार, अशी विचारणा केली. त्यानंतर नेकलेस रस्त्याचे काम सोमवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी दिली. रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे काम महावितरणमार्फत सुरू करण्यात येणार असून, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभाग, महावितरण इत्यादी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जागा कमी असताना गोरक्षण रस्त्याची निविदा मंजूर कशी?शहरातील गोरक्षण रोड रस्ता कामासाठी जागा कमी उपलब्ध असताना, या रस्ता कामाची निविदा मंजूर कशी करण्यात आली, अशी विचारणा खा. संजय धोत्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली. शहरातील अनेक रस्त्यांच्या मधात विद्युत खांब उभे असताना, रस्ता कामांच्या निविदा कशा काढता, असा सवालही त्यांनी केला.