रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
अकोला : शिवनी बायपास ते रिधोरा बायपासपर्यंतचे रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या सिमेंट रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ऑटो चालकांविरुद्ध मोहीम
अकोला : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना, त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी वाहतूक शाखा व विविध पोलीस ठाण्यांकडून क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोंवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ऑटो चालकांनी क्षमतेच्या मर्यादेतच प्रवाशांची वाहतूक करावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
वाहने धूळखात पडून
अकोला : पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेली, तसेच विविध गुन्ह्यांतील वाहने धूळखात पडून आहे. काही वर्षांपूर्वी या वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आता पुन्हा नव्याने घडलेले गुन्हे व काही बेवारस आढळलेली वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात धूळखात पडून आहेत.
एकेरी वाहतुकीने वाहन चालक हैराण
अकोला : जेल चौक ते कौलखेड रोडवर सिंधी कॅम्प परिसरात एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या एकेरी वाहतुकीच्या रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून, दगडही टाकून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हाणामारीतील आरोपींवर कारवाई नाही
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनी येथील राहुलनगरमध्ये संतोष वाठोरे नामक युवकावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही पोलिसांनी गंभीर कारवाई केली नसल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे केली आहे. या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कौलखेड चौकात अतिक्रमण वाढले
अकोला : कौलखेड चौकात व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. चौकातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.